मुंबईः गुजरातमध्ये काँग्रेसचा सुफडा साफ झाला असला तरी हिमाचलमध्ये काँग्रेसनं सत्तांतर घडवत बहुमत मिळवलं आहे. मात्र निकालातून अधिक चर्चा होत आहे ती आम आदमी पार्टीचीच. निवडणुका गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोनच राज्यात होत्या. पण काँग्रेस आणि आम आदमी पार्टीसाठी या निवडणुका फार महत्वाच्या ठरल्या आहेत. गुजरात गमावलं पण काँग्रेसनं हिमाचल कमावलं सध्याच अशीच परिस्थतिती आहे.
तर आम आदमी पार्टीनं गुजरातमध्ये 5 आमदार निवडून आणले आहेत. पडत्या काळात हिमाचलमधला विजय काँग्रेससाठी दिलासा देणारा असला तरी गुजरातमध्ये जे काही घडलं आहे ते देशातल्या सर्वात जुन्या पक्षासाठी मात्र चिंताजनक बाब आहे.
गुजरातमध्ये काँग्रेस 77 वरुन 17 वर आली आहे तर म्हणजेच तब्बल 60 जागा काँग्रेसनं गमावल्या
याउलट आम आदमी पार्टीनं लक्ष वेधून घेतलं आहे.
केजरीवालांच्या पक्षाचे पाचच आमदार आले असले, तरी आपनं चांगली मतं घेतली आहेत. आप दिल्लीत सत्तेत आहे, पंजाबमध्येही सत्तेत आहे मात्र आता गुजरातमध्येही आपनं चांगली लढत दिली आहे
काँग्रेसला गुजरातमध्ये 28 टक्के मतं मिळाली आहेत, तर आम आदमी पार्टीला 13 टक्के मतं मिळाली 13 टक्के मतांमुळंच आपला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळणार आहे.
13 टक्क्यांमध्ये आपचे 5 आमदार निवडून आले आहेत. मात्र मतांचं रुपांतर आणखी काही आमदारांच्या विजयांमध्ये होऊ शकलेलं नाही. तरीही आपची कामगिरी ही लक्षवेधी आहे. आणि काँग्रेसला विचार करायला लावणारी आहे.
15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला, दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीतून आपनं जसं दूर केलं. तशीच कमाल गुजरातमध्ये होईल असं केजरीवालांना वाटलं होतं.
त्यामुळंच त्यांनी जाहीरपणे सत्ता येणारच असं लिहून दिलं होतं. मात्र मतदारांना गृहित धरुन चालत नाही, हे केजरीवालांनाही आता समजलं असणार असल्याचे बोललं जात आहे.
काँग्रेसशासीत राज्याचा विचार केला तर देशात सध्या राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आणि बिहारपुरता मर्यादित आहे. काँग्रेसची लढाई थेट भाजपशी आहे, पण भाजपच्या ताकदीनं काँग्रेस लढताना दिसत नाही, हे सध्याचं मात्र वास्तव आहे.