चतरा : झारखंडमधील चतरा जिल्ह्यात एक अनोखी घटना उघडकीस आली आहे. ही घटना उघड होताच जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. खेळता खेळता एक तीन वर्षाचा बालक विहिरीजवळ पोहचला. विहिर 40 फूट खोल होती. तीन वर्षाच्या मुलाचा तोल जाऊन तो 40 फूट विहिरीत पडला. पण त्याचवेळी तिथे असलेल्या 13 वर्षांच्या मुलीने मुलाला विहिरीत पडताना पाहिले आणि तात्काळ विहिरीत उडी मारली. मात्र मुलीचे धाडस वाया गेले नाही. खरोखरच तीन वर्षाच्या बालकासाठी ही 13 वर्षाची चिमुरडी देवदूत बनली अन् जिल्ह्यात एकच चर्चा झाली. मुलीने धाडस दाखवत मुलाचे प्राण वाचवले.
रांचीपासून सुमारे 170 किमी अंतरावर असलेल्या चतरा जिल्ह्यातील मयूरहंद ब्लॉकमधील हुसैन गावात रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. एक तीन वर्षाचा बालक खेळता खेळता विहिरीजवळ गेला. यावेळी तोल जाऊन तो विहिरीत पडला. ही बाब 13 वर्षाच्या मुलीने पाहिली आणि मुलाला वाचवण्यासाठी तात्काळ विहिरीत उडी घेतली.
मुलीने मुलाला एका हाताने विहिरीत पकडले आणि दुसऱ्या हाताने मोटार धरून मदतीसाठी जोरजोरात ओरडू लागली. मुलीचा आवाज ऐकून काही गावकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर मुलगी आणि चिमुकल्याला दोरीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. चतरा उपायुक्त अबू इम्रान यांनी सांगितले की, घटनेचा तपशील मागवला आहे. 13 वर्षीय मुलीचे शौर्य पाहून तिला बक्षीस देण्यात येणार आहे.
या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली आहे. मुलीला ग्रामपंचायत नेते, सरपंच आणि अन्य गावकऱ्यांनी शेख भिखारी मेडिकल कॉलेज हजारीबाग येथे उपचारासाठी दाखल केले आहे.