गुगल मॅपने दाखविला मार्ग अन् त्यांची कार थेट नदीतच पडली, दोन तरुणांचे प्रसंगावधान मग…अखेर

| Updated on: Jun 30, 2024 | 9:40 PM

गुगल मॅपने रस्ता चुकविल्याने कार नदीत वाहून जाणार इतक्यात या तरुणांनी प्रसंगावधान दाखविल्याने त्यांची बचाव पथकाने सुटका केल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी लोकांना गुगल मॅपवर प्रवासाचा योग्य मार्ग निवडण्याचे आवाहन केले आहे.

गुगल मॅपने दाखविला मार्ग अन् त्यांची कार थेट नदीतच पडली, दोन तरुणांचे प्रसंगावधान मग...अखेर
GOOGLE MAP MISGUIDED
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

तिरुवनंपुरम : गुगल मॅपवर भरोसा ठेवल्याने वाट चुकण्याच्या घटना अलिकडेच घडत आहेत. आता गुगल मॅपवर पाहात रस्ता शोधणाऱ्या दोघा मित्रांची कार थेट नदीच्या पाण्यातच पडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे त्यांच्या जीवावर आलेले संकट त्यांनी प्रसंगावधान दाखविल्याने थोडक्यात टळल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे गुगल मॅपवर जास्त विसंबून राहणे जीवावर बेतू शकते असे म्हटले जात आहे.

केरळातील कासारगोड जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. कुट्टीकोल येथील पल्लनची वन क्षेत्रातील मार्गावर ही घटना घडली आहे. अब्दुल रशीद ( 35 ) तशरीफ ( 36 ) हे दोघे जण शेजारील कर्नाटक राज्यातील उप्पीननगडी येथील रुग्णालयात कारने जात होते. ते गुगल मॅपवर हे हॉस्पिटल शोधत आपली कार चालवित होते. त्यावेळी अचानक त्यांची कार नदीच्या पुलावर पोहचली ज्या पुलाला तटबंदीच नव्हती. पल्लनची नदी पावसाने दूथडी भरुन वाहत होती. त्यामुळे रोड संपूर्ण पाण्याने भरल्याने त्यांची कार पाण्यात बुडण्याच्या बेतात होती.

पहाटे सहा वाजता हा प्रकार घडल्याने धुक्याने आणि पावसाने अंधारात त्यांना नदी देखील नीट दिसली नाही. ते गुगल मॅपवर विसंबून रस्ता चुकल्याने त्यांच्या कार पाण्यात तरंगू लागली आणि 200 मीटर वाहून ती नशीबाने झाडाच्या काही फांद्यांमुळे अडकली. त्यानंतर त्यांनी कसेबसे कारची खिडकी कशी तरी खाली करीत मोबाईलवरून नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर घरच्यांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर थोड्याच वेळाने बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी नवीन पुल तयार होऊनही गुगल मॅपवर जुन्याच पुलाचा नकाशा दाखविल्याने त्यांची कार जुन्या बंद पडलेल्या पुलावर पोहचल्याने उघडकीस आले.

केरळातला पहिलाच प्रकार नव्हे

ही गुगल मॅपने मिसगाईड केल्याची पहिलीच घटना नसून गेल्या महिन्यात देखील हैदराबाद येथील एक टुरिस्ट ग्रुपची गाडी अशीच गुगल मॅपमुळे पाण्याच्या प्रवाहात पोहचली होती. त्यावेळी कारमधील चार जणांची स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी वेळीच मदत केल्याने सुटका झाली होती. 2023 मध्ये एका डॉक्टर आणि त्याचे मित्र बर्थ डे पार्टीवरुन परतत असताना जीपीएसने लोकेशन चुकीचे दाखविल्याने त्यांची कार पेरियार नदीत पोहचली. यावेळी या नदीला कोणतीही तटबंदी किंवा साईनबोर्ड नसल्याने त्यांचे प्राण धोक्यात आले. त्यानंतर या तिघांची सुटका स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी केली.