नवी दिल्ली | 25 ऑगस्ट 2023 : रेल्वे प्रवासात काही घटकांना प्रवासात सवलत दिली जाते. जर तुम्ही ट्रेनने प्रवास करणारे असाल तर तुम्हाला ही माहीती असायला हवी. कोरोनाकाळानंतर ज्येष्ठ नागरिकांना आणि अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना मिळणारे आरक्षण सध्या बंद आहे. तरीही अनेक घटकांना अजूनही प्रवासात सवलत मिळत असते. भारतीय रेल्वे जगातील चौथे सर्वात मोठे नेटवर्क आहे. दरदिवशी रेल्वेने सुमारे दोन कोटी प्रवासी प्रवास करतात. त्यातील काही घटकांना तिकीटात सवलत मिळत आहे.
भारतीय रेल्वेत प्रवासात दिव्यांगजन, दृष्टीने अधू, गतिमंद व्यक्ती अशा व्यक्तीला रेल्वेत सवलत दिली जाते. या कॅटगरीच्या लोकांना जनरल क्लासपासून स्लीपर आणि थर्ड एसी वर्गाच्या डब्यातील तिकीटावर सवलत दिली जाते. या कॅटगरीतील प्रवाशांच्या तिकीटात 75 टक्के सूट दिली जाते असे झी बिझनेसन वेबसाईटने दिली आहे.
जर प्रवासी एसी फर्स्ट क्लास किंवा सेकेंड क्लास मधून प्रवास करणार असतील तर मात्र त्यांना 50 टक्के तिकीट सवलत मिळते. तर राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेससारख्या प्रतिष्ठीत गाड्यांमधून जर दिव्यांगजन, दृष्टीने अधू, गतिमंद व्यक्तींना तिकीटात 25 टक्के सवलत मिळते.
रेल्वेतून प्रवास करणारे जर प्रवासी मूक आणि बधिर असतील तर त्यांनाही ट्रेनच्या तिकीटात 50 टक्के सवलत मिळते. अशा प्रवासी जर एकट्याने प्रवास करण्यास समर्थ नसल्यास त्याच्या एका सह प्रवाशाला देखील तिकीटात सारखेच सवलत मिळते.
रेल्वे प्रवासात अनेक आजारांनी पिडीत असलेल्या व्यक्तींना देखील प्रवास सवलत मिळते. जसे कॅन्सर , थॅलेसिमिया, हृदय विकाराने ग्रस्त व्यक्ती, किडनीच्या आजाराने त्रस्त व्यक्ती, हिमोफीलिया आजाराचे रुग्ण, टीबीचे रुग्ण, एड्सचे रुग्ण, ऑस्टोमीचे रुग्ण, एनिमिया, अप्लास्टीक एनीमियाचे रुग्ण यांना प्रवासात सवलत दिले जाते.