रोहतक : न्यायधीश आणि त्याच्या पत्नीच्या छळा (Harassment)ला कंटाळून हरियाणा पोलिस जवानाने सर्व्हिस रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना बुधवारी संध्याकाळी भालाउथ गावात घडली आहे. सुनील असे आत्महत्या करणाऱ्या गनमॅनचे नाव असून तो किलोई गावचा रहिवासी होता. आत्महत्येपूर्वी सुनीलने सुसाईड नोट (Suicide Note) लिहिली आहे. यात त्याने न्यायाधीश आणि त्याची पत्नी छळ करीत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
सुनीलने बुधवारी सुट्टी घेतली होती. त्यानंतर तो आधी किलोई गावात त्याच्या घरी गेला. त्यानंतर भलोथ गावात त्याचे सर्व्हिस स्टेशन होते, तो त्याच्या सर्व्हिस स्टेशनवर गेला. संध्याकाळी तो आधी दारू प्यायला आणि नंतर त्याच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली. माहिती मिळताच पोलीस आणि एफएसएल टीम घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर घटनास्थळावरून दारूची बाटली, रिव्हॉल्व्हर आणि एक सुसाईड नोट जप्त करण्यात आली. मयताने सुसाईड नोटमध्ये न्यायाधीश आणि त्याच्या पत्नीवर अत्याचार केल्याचा आरोप करत आपल्या मृत्यूसाठी त्यांना जबाबदार धरले आहे.
आयएमटी स्टेशन प्रभारी कैलाश चंद यांनी सांगितले की, घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही जप्त करण्यात आली आहे. कुटुंबीयांनीही तक्रार दिली असून, त्यानुसार चौकशी करत पुढील कारवाई केली जाईल. मृताच्या मोठ्या भावाने सांगितले की, न्यायाधीश आणि त्याची पत्नी त्याच्या भावाचा नेहमी छळ करत होते. तो अनेकदा तक्रार करत असे, पण आम्ही त्याला समजावून सांगायचो. कदाचित त्याच्या संयमाचा बांध फुटला आणि तो आपल्याला सोडून निघून गेला. आरोपींवर कठोर कारवाई करून आम्हाला न्याय मिळावा, अशी आमची इच्छा आहे, जेणेकरून कोणत्याही कुटुंबातील मुलाने असे जीवन संपवू नये.