नवी दिल्ली : पाकिस्तानची (Pakistan) अवस्था सध्या घर का ना घाट का का? अशी झाली आहे. येथील सरकार भीकेला लागले आहे. महागाईने कळस गाठल्याने सर्वसामान्य जनतेची अवस्था वाईट आहे. प्रत्येक वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत. पेट्रोल-डिझेलपासून ते दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि खाद्यान्न प्रचंड महागले आहे. पाकिस्तान सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. पाकिस्तान हा न राहण्याजोगा देश झाला आहे. पण तरीही काही भारतीय नागरिकांनी (Indian Citizenship) उंबरठा ओलांडून पाकिस्तान गाठला आहे. त्यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व पत्करले आहे. गेल्या पाच वर्षांत भारतातून पाकिस्तानमध्ये गेलेल्या नागरिकांची संख्या खूप मोठी नाही.
पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने याविषयीची माहिती दिली. भारतातून अथवा इतर देशातून पाकिस्तानमध्ये अनेक जणांनी नागरिकत्व घेतले आहे. त्यामागे लग्न आणि कौटुंबिक कारणे आहेत. या कारणांमुळे ही लोक पाकिस्तानची नागरीक झाली आहेत. पाच वर्षांमध्ये 214 विदेशी नागरिकांनी पाकिस्तानी नागरिकत्व स्वीकारल्याची माहिती त्यांनी दिली. यामध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. 159 भारतीयांनी पाकिस्तानमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे.
अवस्था बिकट असतानाही, दोन भारतीय नागरिकांनी गेल्या महिन्यात पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले. 2022 मध्ये पाकिस्तानमध्ये अस्थिरता असून ही 18 भारतीयांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले. 2021 मध्ये 27 जणांनी पाकिस्तान जवळ केला. कोरोना काळात पाकिस्तानमध्ये कोणीही गेले नाही. 2019 मध्ये 55 जणांनी पाकिस्तानमध्ये अधिकृत प्रवेश केला. 2018 मध्ये 43 भारतीयांना पाकिस्तानी राष्ट्रीयत्व देण्यात आले. समा टीव्हीच्या अहवालानुसार, अजूनही गृहमंत्रालयाकडे अनेक अर्ज प्रलंबित आहेत.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, लग्न, कौटुंबिक संबंध, व्यावसायिक अथवा इतर कारणांमुळे नागरिकत्वासाठी अर्ज करण्यात आले. पाकिस्तानमध्ये अनेक वर्षांपासून राहणाऱ्या नागरिकांनी पाकिस्तानी राष्ट्रीयत्वासाठी अर्जफाटे केले आहेत. या सर्व कारणांमुळे परदेशी नागरिकांना सामावून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. अजूनही अनेकांचे अर्ज प्रलंबित आहेत.
सध्या पाकिस्तानचे अफगाणिस्तानसोबत संबंध ताणल्या गेले आहेत. तालिबानमुळे अनेक अफगाणी नागरीक पाकिस्तानच्या वाटेवर आहेत. 11 अफगाणी नागरिकांना पाकिस्तानचे नागरिकत्व देण्यात आले आहे. 2022 मध्ये 4, 2021 मध्ये 1, 2020 मध्ये 3, 2019 मध्ये 2 आणि 2018 मध्ये 1 अफगाणी नागरिकाला पाकिस्तानी राष्ट्रीयत्व बहाल करण्यात आले.
गेल्या पाच वर्षांत 3 चिनी नागरिकांना पाकिस्तानचे राष्ट्रीयत्व बहाल करण्यात आले. तर चार बांग्लादेशी, एक इतालवी, एक स्विस, तीन अमेरिकन, दोन कॅनेडा आणि चार ब्रिटिश नागरिकांना पाकिस्तानचे नागरिकत्व देण्यात आले आहे. म्यानमार, फिलिपिन्स, मालदीव, किर्गिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळमधील 20 हून अधिक नागरिकांना पाकिस्तानी नागरिकत्व देण्यात आले.