घनघोर कलियुग आलं आहे, उत्तर प्रदेशातील कन्नौज येथे एक चमत्कारीक प्रकार घडला आहे. येथे एका पतीने दुसरा विवाह करण्यासाठी पहीली पत्नी जीवंत असतानाही तिचे श्राद्ध घातल्याचा प्रकार घडला आहे. एवढंच नाही तर पतीने सोशल मिडीयावर पत्नीच्या मृत्यूच्या बातमीसह तिच्या श्राद्ध आणि शांती पूजेचा फोटोही टाकला. या फोटोला कॅप्शन म्हणून या नवरोबाने लिहीले की भगवान पूजा की आत्मा को शांती दे !
वास्तविक पूजा आणि तिच्या पतीत भांडणं सुरु होती. त्यामुळे पूजा रागावून तिच्या माहेरी राहात होती. सोशल मिडीयातून पतीचे कारनामे उघड झाल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर पूजाने आपल्यावरील अन्यायासाठी पोलिसांकडे धाव घेतली. तिने कन्नौजच्या एसपी कार्यालयात धाव घेतली.तिने दावा केला आहे दोन्ही मुलांना पतीने जबरदस्तीने स्वत:कडे ठेवले आहे. त्यांचे अपहरण केल्याचाही आरोप पूजाने केला आहे.
मूळची कानपूरच्या किडवई नगरच्या रहिवासी असलेल्या पूजा यांनी सांगितले की तिचा विवाह मार्च 2009 रोजी कन्नौज येथील तालग्राम क्षेत्रात राहणाऱ्या पवन पटेल याच्याशी झाला होता. त्याना दोन मुलेही झाली. अडीच वर्षांपूर्वी पवन याने एका मुलीला पळवून आणले.त्यानंतर दोघांमध्ये भांडणे झाली. त्यानंतर तिने मुलांना घेऊन माहेर गाठले. तेव्हापासून ती माहेरीच राहात आहे. त्या दरम्यान पतीने दुसरा विवाह केला आणि दुसरा विवाह करण्यासाठी आपले श्राद्ध घातल्याचे पूजा यांनी सांगितले.त्याने आपल्या मृत्यूचा फोटोही सोशल मिडीयावर अपलोड केल्यानंतर हे उघडकीस आले.
मी हयात असताना माझा पती पवन पटेल याने 23 जून 2023 रोजी माझे श्राद्ध घातले. त्यानंतर आरामात दुसरे लग्न केले. मला एके दिवशी सोशल मिडीयाद्वारे माहिती मिळाली की माझ्या पतीने माझा फोटो पोस्ट करुन माझे श्राद्ध घातले आहे. माझा हार घातलेला एक फोटो देखील सोशल मिडीयावर टाकला असून समोर अगरबत्ती आणि दिवे लावले आहे. आणि फोटोवर लिहीलेय की, ‘भगवान पूजा की आत्मा को शांती दे’ त्यामुळे आपण पोलिसांकडे दाद मागायला आल्याचे पूजाने म्हटले आहे.