मुंबई | 10 डिसेंबर 2023 : अयोध्येत राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी खास तयारी करण्यात येत आहे. मंदिर समितीकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. देशभरातून चार हजार संत महात्मे यानिमित्त अयोध्येमध्ये दाखल होतील. तर, सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गजही उपस्थित राहणार आहेत. राम मंदिराच्या याच लोकार्पण सोहळ्यावरून खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र डागलंय. भाजपा हा पक्ष नसून इव्हेंट मॅनेजमेन्ट कंपनी असल्याचा टोला राऊत यांनी लगावला.
अयोध्येत राम मंदिर उभं करतायेत ही आनंदाची गोष्ट आहे. प्रभू श्रीराम हे सगळ्यांचे आहेत. पण, तुम्ही जे राजकारण सुरू केलं रामाच्या नावानं की आम्ही रामाचे. अयोध्येचा सातबारा आमच्या नावावर आहे अशा तऱ्हेने भारतीय जनता पक्ष वागतो आहे. पण, लक्षात घ्या तिथे शिवसैनिक घुसले नसते. त्याग केला नसता. तर आज हे राम मंदिर उभं राहिलं नसतं अशी टीका संजय राऊत यांनी केलीय. राममंदिर ही काही भाजपाची जहागीर नाही राम मंदिर केवळ हिंदूंचंच नव्हे तर सर्व धर्मियांचं प्रेरणास्थान असल्याचंही राऊत यांनी म्हटलंय.
त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय. ‘उनको लगता था की कभी भी मंदिर नहीं बनेगा. राम मंदिर नहीं बनेगा. वो कहते थे मंदिर वही बनायेंगे. तारीख नाही बतायेंगे. मोदिजीने मंदिर भी बनावाया और तारीख भी बतायी. बोलेने वाले का मुह बंद हो गया.’, असा टोला शिंदे यांनी लगावला.
शिंदे गटाचे मंत्री उद्या सामंत यांनीही काही लोकांनी हे राम मंदिर स्वप्नामध्ये बघितलेलं होतं. ते पूर्ण होईल याची खात्री कोणाला नव्हती. पण ते पूर्ण करण्याचं काम देशाच्या पंतप्रधानांनी केलेलं आहे, असा टोला संजय राऊत यांना लगावलाय.
त्यावर संजय राऊत यांनी पुन्हा नवीन वर्षाला गुढ्या तोरणं उभारण्याची परंपरा आहे. आम्ही अशा गुढ्या उभारतो, तोरणं उभारतो. आणि यापुढे उभारू. त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या आदेशाची गरज नाही. पण, राम मंदिर म्हणजे भारतीय जनता पक्षाची जहागीर नाही आहे. या जगातल्या तमाम हिंदूंचं नव्हे तर सर्व ते प्रेरणास्थान राहील. जर रामाची मालकी भाजप घेत असेल तर ते रामाचं अवमूल्यन करता येईल असं म्हणत भाजपला टिकेचं लक्ष्य केलंय.