नवी दिल्लीः गुजरात दंग्यांवर आधारीत डॉक्युमेंट्रीवरून बीबीसीविरोधात सुरु झालेला वाद पेटला असतानाच आणखी एक मोठी बातमी हाती आली आहे. दिल्ली येथील बीबीसीच्या मुख्यालयावर प्राप्तिकर विभागाच्या वतीने धाड टाकण्यात आली आहे. आयकर विभागाचे अधिकारी या कार्यालयाची झाडा झडती घेत आहेत. नुकत्यात हाती आलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील सर्व कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आले आहेत. तसेच अकाउंड ऑफिसमध्ये ठेवलेल्या कंप्यूटरचा डेटाही खंगाळण्यात येत आहे. दिल्लीतील कार्यालयातून कोणत्याही कर्मचाऱ्याला बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली नाही.
दिल्लीसोबतच मुंबई बीकेसी येथील बीबीसी कार्यालयातही IT चं धाडसत्र सुरु झालं आहे. या कार्यालयात बाहेरील व्यक्तींना जाण्याची परवानगी दिलेली नाही. सिक्योरिटीकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ITची टीम येथे आली असून, त्यांची कारवाई सुरू आहे.
मुंबईतील बीकेसीच्या आवारात विंडसर बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर बीबीसीचे कार्यालय आहे. आणि त्याचवेळी ITचे कर्मचारी हजर राहून कारवाई करत आहेत.
मुंबई आयकर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथे आलेली आयकर टीम दिल्लीची आहे. सध्या आयकर पथकाने बीबीसी कार्यालयात शोध सुरू केली आहे. सध्या बीबीसी कार्यालयात कोणालाही जाण्याची परवानगी नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांपासून आयकर विभागाला या कार्यालयांमध्ये आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची माहिती मिळाली होती. याच संदर्भाने ही झाडा झडती सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. बीबीसीच्या खात्यांसंबंधीची माहिती आयकर विभागातर्फे खंगाळून काढली जात आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी बीबीसी कार्यालयातील अनेक कंप्यूटर्स आपल्या ताब्यात घेतले आहेत.
पहले BBC की डॉक्यूमेंट्री आई, उसे बैन किया गया।
अब BBC पर IT का छापा पड़ गया है।
अघोषित आपातकाल
— Congress (@INCIndia) February 14, 2023
दरम्यान, बीबीसी कार्यालयांवरील छापेमारीनंतर काँग्रेसने केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. आधी बीबीसीची डॉक्युमेंटरी आली. त्यावर बंदी घातली. आता बीबीसीवर आयटीची छापेमारी झाली. ही अघोषित आणीबाणी असल्याची गंभीर टीका काँग्रेसने केली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी बीबीसी ऑफिसवर धाड पडल्यानंतर प्रतिक्रिया दिली. अदानी प्रकरणावरून आम्ही जेपीसीची मागणी करत आहोत. आता सरकार बीबीसीच्या मागे लागली आहे. विनाश काले विपरीत बुद्धी, अशी टीका जयराम रमेश यांनी केली आहे.