सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. वर्षाचा अखेरचा महिना असल्याने अनेकांनी लग्नाचे बेत आखले आहेत. राज्यातच नव्हे तर देशात धुमधडाक्यात लग्न समारंभ होत आहेत. आपल्या देशात लग्न समारंभ एका उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. त्यासाठी जोरदार तयारी केली जाते. प्रचंड पैसा खर्च केला जातो. लग्नानंतर नव दाम्प्त्य हनिमूनसाठी जातात. पण आता या त्यांना इन्कम टॅक्स विभागाच्या खेपा घालाव्या लागण्याची शक्यता आहे. लग्नात बेहिशोबी खर्च करणाऱ्यांवर आयकर विभागाची करडी नजर आहे. ज्यांच्याकडे लग्नाच्या खर्चाचा हिशोब नाही, अशा लोकांवर आयकर विभागाची संक्रात कोसळण्याची शक्यता आहे.
इकॉनॉमिक्स टाइम्समने याबाबतचं एक वृत्त दिलं आहे. नोव्हेंबर- डिसेंबरच्या दरम्यान अनेक शहरांमध्ये ग्रेट ग्रँड वेडिंग झाल्या आहेत. या लग्नांमध्ये करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत. पैशाचा पाऊस पडावा अशा पद्धतीने या लग्न सोहळ्यात प्रचंड खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर हे लग्न सोहळे आले आहेत. विशेष म्हणजे ज्या लग्न सोहळ्यांना बॉलिवूड स्टार्स किंवा सेलिब्रिटिजना आमंत्रित करण्यात आलं होतं, अशा लग्न सोहळ्यावर इन्कम टॅक्स विभागाची करडी नजर आहे.
या वृत्तानुसार, जयपूरच्या 20 वेडिंग प्लानर्सच्या घर आणि कार्यालयावर इन्कम टॅक्स विभागाची धाड पडली. गेल्या वर्षी ज्या ग्रँड वेडिंग झाल्या त्यात 7500 कोटी रुपये खर्च झाले. विशेष म्हणजे कॅशमध्ये हा खर्च झाला. त्याचा कोणताचा हिशोब नाहीये. याबाबत फेक बिल बनणारा संशयित एंट्री ऑपरेटर्स, हवाला एजेंट्स आणि म्यूल अकाऊंटस चालवणारे हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये बसलेल्या पार्टनरसोबत मिळून धंदा करत होते. त्याचीही आयकर विभाग चौकशी करत आहे.
तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग केली असेल तर डेस्टिनेशन वेडिंग सुद्धा आता इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर आहे. या बाबत इन्कम टॅक्स विभागाने अनेक ठिकाणी चापेमारी केली आहे. या छापेमारीत रोख व्यवहार झाल्याचं आढळून आलं आहे. तसेच 50 ते 60 टक्के विवाह रोख रकमेत झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच ज्यांनी बॉलिवूड स्टार्सला चार्टड प्लेनने बोलवून त्यांचा परफॉर्मन्स ठेवला, असे लग्न सोहळेही इन्कम टॅक्सच्या रडारवर आले आहेत.
लग्नाची गेस्ट लिस्ट आणि इव्हेंट किती मोठा होता, त्याच्या स्केलच्या आधारावर इन्कम टॅक्स विभाग लग्नाच्या खर्चाच हिशोब तपासणार आहे. कॅटरिंग फार्म्सचीही चौकशी केली जाणार आहे. जयपूरमधील वेडिंग प्लानरच या सर्व लग्नांचा मुख्यसूत्रधार असून तो इतर राज्यातही असे ग्रँड वेडिंग सेरोमनी आयोजित करत असल्याचं इन्कम टॅक्स विभागाच्या तपासात आढळून आलं आहे.