नवी दिल्ली : देशात कोरोना (India Corona Update) रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदवण्यात आली. गुरुवारी (9 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Central Health Ministry) जारी केलेल्या आकडेवारीनुसार तब्बल सात हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण देशात आढलून आले आहेत. त्यामुळेचिंता व्यक्त केली जातेय. गेल्या 24 lतासांत 7,240 नवे रुग्ण आढळून आलेत. तर सध्याच्या घडीला देशातील सक्रिय कोरोना (Active corona cases) रुग्णसंख्या ही 34 हजाराच्या पार गेलीय. देशात आता 32,498 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढतेय. त्यामुळे ही कोरोनाच्या चौथ्या लाटेची सुरुवात तर नाही ना, अशी शंका घेतली जातेय. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आता आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाल्यात. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडूनही राज्यांना खबरदारी घेण्याचे आदेश जारी करण्यात आलेत.
India records 7,240 new COVID19 cases in the last 24 hours; Active cases rise to 32,498 pic.twitter.com/mnXkuoRsCY
— ANI (@ANI) June 9, 2022
गेल्या काही दिवसांपासून देशातच नव्हे तर राज्यातही कोरोना रुग्णवाढीनं चिंत वाढवली आहे. राज्यातील सर्व लोकांना पुन्हा एकदा मास्कचं वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय. तसंच पात्र असणाऱ्यांना बुस्टर डोस घेण्याचंही आवाहन केलं जातंय.
राज्यातही पुन्हा कोरोनाचं टेन्शन वाढलंय. बुधवारी राज्यात दोन हजारपेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णांची भर पडली होती. त्यातील अर्ध्याहून अधिक रुग्ण हे एकट्या मुंबईत आढळून आले होते. बुधवारी राज्यात 2701 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर मुंबईत 1765 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली होती. दरम्यान, मुंबईसह उपनगरांमध्येही कोरोनाचा धोका वाढतोय. पालघर, ठाण्यासह नागपूर, पुण्यातही रुग्णसंख्या वाढतेय.
दोन वर्षांच्या कोरोना महामारीनंतर 2022 मध्ये लोकांच्या तोंडावरचे मास्क उतरवण्याची मुभा मिळालेली होती. पुन्हा सगळे मोकळा श्वास घेऊ लागले होते. पण आता वाढती रुग्णसंख्या पाहता पुन्हा एकदा मास्क वापरण्याचं कळकळीचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं. त्या पार्श्वभूमी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा असं सांगितलं जातंय. मात्र रुग्णवाढ अशीच वाढत राहिली तर पुन्हा मास्क सक्तीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.