नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूच्या प्रमाणातही झपाट्याने वाढ होत आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने गेल्या 48 तासांत 5 महत्वाचे निर्णय घेतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात रोज 2 लाखापेक्षा अधिक नवे रुग्ण सापडत आहेत. रुग्णांचा बेड मिळणं कठीण झालं आहे. तर ज्यांना बेड मिळतोय त्यांना ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. या अडचणींवर मात करण्यासाठी केंद्रासह सर्वच राज्य सरकारांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. (Narendra Modi Government’s 5 important decisions in 48 hours)
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रापाठोपाठ आता दिल्ली आणि राजस्थानमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीय. छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशातील काही शहरातही लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. अनेक राज्यांमध्ये रात्रीची संचारबंदी आणि विकेंड लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. अशावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने या दोन दिवसांत महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला.यापूर्वी सर्वात आधी 60 वर्षांवरील ज्येष्ठांना लस दिली जात होती. त्यानंतर 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोव्हिड 19 लस देण्यााच निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे अनेक राज्यांत रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. अशावेळी केंद्राने रुग्णालयांमधील ऑक्सिजनचा पुरवठा वाढवला आहे. तसंच रुग्णालय परिसरातच ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. 22 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत उद्योगांच्या ऑक्सिजन पुरवठ्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या किमतीत दोन दिवसांपूर्वी कपात करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर रेमडेसिव्हीरच्या मागणीतही वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये रेमडेसिव्हीरचा काळाबाजारही सुरु झाला होता. तो रोखण्यासाठी रेमडेसिव्हीरचं उत्पादन वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय.
अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. अशावेळी रेल्वे मंत्रालयाने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलिंडरचा देशाच्या विविध भागात पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतलाय. या ऑक्सिजनच्या एक्सप्रेसच्या वाहतुकीदरम्यान कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून ग्रीन कॉरिडॉर बनवला जात आहे.
केंद्र सरकारने आरोग्य विभागावरही लक्ष्य केंद्रित केलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. मात्र, रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. बेडसाठी रुग्णांना वाट पाहावी लागतेय आणि त्यातच अनेकांचा जीव जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तात्पुरत्या स्वरुपाची रुग्णालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या मदतीने ही रुग्णालये उभारली जाणार आहेत. दिल्लीच्या कँट, लखनऊमध्ये डीआरडीओ आणि छतरपूरमध्ये सैन्याने अशाप्रकारच्या रुग्णालयांची उभारणी केली आहे.
संबंधित बातम्या :
मोठी बातमी, 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार
Narendra Modi Government’s 5 important decisions in 48 hours