नवी दिल्ली | 6 सप्टेंबर 2023 : G-20 कार्यक्रमासाठी पाहुण्यांना पाठविलेल्या निमंत्रण पत्रिकेने देशात नवीन महाभारताला फोडणी दिली. इंडिया या शब्दाऐवजी राष्ट्रपती द्रौपर्दी मूर्म यांनी भारत हा शब्द वापरला. विरोधी पक्षाच्या आघाडीला सध्या INDIA असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. आघाडीला घाबरुनच केंद्र सरकारने ही चाल खेळल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यात संसदेच्या नवीन इमारतीत विशेष सत्र होण्याची शक्यता आहे. विशेष सत्रात देशाचे अधिकृत नाव भारत करण्याचा प्रस्ताव मांडल्या जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. इंडिया हे गुलामीचे प्रतिक असल्याने ते बदलण्याचा विचार बोलून दाखविण्यात येत आहे. पण यामध्ये आणखी एक चिंता समोर येत आहे. यापूर्वी 8 नोव्हेंबर 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली होती. त्यानंतर या 23 मे 2023 रोजीपासून दोन हजारांची नोट माघारी घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे नावात बदल झाला तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ऐवजी रिझर्व्ह बँक ऑफ भारत (Reserve Bank Of Bharat) अशा नोटा बाजारात आणव्या लागतील काय, अशी आशंका विचारण्यात येत आहे.
काय होऊ शकते?
काही तज्ज्ञांच्या मते, इंडिया ऐवजी भारत हा शब्द अधिकृत केला तरी, केंद्र सरकार नोटबंदी करण्याची घाई करणार नाही. असा धोका पत्करणे सध्याच्या सत्ताधाऱ्यांना योग्य नसेल. त्यामुळे नोटबंदीचा धोका हे सरकार उचलणार नाही. गेल्यावेळी झालेल्या नोटबंदीचा परिणाम देशावर अनेक दिवस दिसून आला. त्याऐवजी मध्यम मार्ग काढण्यावर भर देण्यात येऊ शकतो.
2000 रुपयांच्या नोटांचा फॉर्म्युला येईल कामी
केंद्र सरकारने 2016 मधील नोटबंदीवरुन धडा घेतला आहे. त्यांनी 2000 रुपयांच्या नोटा बदलताना ही चूक होऊ दिली नाही. त्यांनी गुलाबी नोटा माघारी बोलावल्या. बाजारात त्याविरोधात काहीच मोठा रोष दिसून आला नाही. केंद्र सरकारने बँका, बँकांचे मदत केंद्र येथे ही नोट जमा करण्यासाठी विशेष व्यवस्था केली. नवीन गुलाबी नोटांची छपाई बंद करण्यात आली. या सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत नागरिकांना या नोटा बँकेत जमा करता येणार आहे. केंद्र सरकारसमोर हा एक पर्याय उपलब्ध आहे. त्याआधारे जुन्या नोटांऐवजी नवीन नोटा बाजारात येऊ शकतात.
रिझर्व्ह बँकेचे नाव बदलावे लागेल
जर केंद्र सरकारने इंडिया या शब्दाऐवजी भारत या शब्दाला अधिकृत दर्जा दिला. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नावात बदल होईल. हे नाव बदलणे बंधनकारक होईल. कारण कोणत्याही देशाचे चलन त्या देशाचे प्रतिक असते. त्यावर दुसरा शब्ध स्वीकार्यह नसेल. अशावेळी नोटांवरील नाव बदलणे गरजेचे होईल.
दीर्घ प्रक्रिया
अर्थात भारत हा शब्द अधिकृत केला तर लागलीच रात्रीतूनच नोटा बदलतील, असे होणार नाही. त्यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा लागेल. एका कार्यकाळात नोटांवरील इंडिया हे नाव हटवून नवीन भारत नावासह नोटा बाजारात येतील. टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. या प्रक्रियेतून अर्थव्यवस्थेला कोणतेही नुकसान होणार नाही.