मुंबई | 4 फेब्रुवारी 2024 : भारताला अमेरिकेकडून खतरनाक प्रीडेटर ड्रोन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार विभागाने या डीलला हिरवा कंदील दाखवला आहे. या कराराअंतर्गत एकूण 31 अत्याधुनिक ड्रोन मिळणार आहेत. या ड्रोन सोबत मिसाईल, लेझर बॉम्ब, आणि कम्युनिकेशन तसेच सर्व्हीसचे अन्य उपकरणे देखील मिळणार आहेत. गेल्यावर्षी जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला होता त्यावेळी या कराराची घोषणा केली होती. अमेरिकेच्या संसदेने मंजूरी दिल्यानंतर हा करार अखेर प्रत्यक्षात येणार आहे. या ड्रोनचा वापर सीमेवरील चीन आणि पाकिस्तानवर नजर ठेवण्यासाठी होणार आहे. या ड्रोनवर मिसाईल आणि स्मार्ट बॉम्ब देखील आहेत. त्यामुळे शत्रूच्या तळांवर हल्ले करणे सोपे होणार आहे. हा करार अस्तित्वात येण्यासाठी जनरल एटॉमिक्स ग्लोबल कॉर्पोरेशनचे डॉ. विवेक लाल यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे.
मुळचे भारतीय असलेले विवेक लाल यांचा जन्म इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे झाला आहे. त्यांची या करारासाठी खूप महत्वाची मदत झाली आहे. अमेरिकेतील कंसास प्रांतच्या wichita state university तून त्यांनी एरोस्पेस इंजिनिअरिंगमधून पीएचडी केली आहे. त्यानंतर विवेक लाल यांनी बोईंग, रेथिअन आणि लॉकहीड मार्टीन सारख्या संरक्षण साहित्य तयार करणाऱ्या कंपनीत काम केले आहे. ते बाईंग कंपनीच्या इंडीया युनिटचे हेड देखील होते. रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये देखील त्यांनी काम केले आहे. परंतू जून 2020 मध्ये जनरल एटॉमिक्सचे सीईओ झाल्यानंतर भारताला ही टेक्नॉलॉजी मिळण्यासाठी त्यांची भूमिका महत्वाची ठरली आहे.
जनरल एटॉमिक्स ही कंपनी सुरुवातीपासून दोन्ही सरकारांशी संपर्क ठेवून भारताला डिफेन्स सेक्टरमध्ये तंत्रज्ञान पुरविण्यास मदत करीत आहे. भारताच्या संरक्षण गरजा पूर्ण करण्यासाठी काही देशी कंपन्यांशी देखील कंपनीने भागीदारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात त्यांच्याशी वन-टू-वन मिटींग करुन भारताला प्रीडेटर ड्रोन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रीडेटर ड्रोनला MQ-9 Reaper देखील म्हटले जाते. हे ड्रोन आकाशात 36 तासांपर्यंत सातत्याने उड्डान करु शकते. हे ड्रोन 50 हजार फूटांपर्यंत उंचीवरून 3000 किमीपर्यंत प्रवास करु शकते. हे ड्रोन कोणत्याही अत्याधुनिक फायटर जेटपेक्षा कमी नाही. यावर खतरनाक मिसाईल तैनात करता येऊ शकतात. याचा लक्ष्य अचूक असून शत्रूंच्या अड्ड्यांना ते क्षणात नष्ट करु शकते. हे केवळ आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण नसून ते शांतपणे कोणताही आवाज न करता टार्गेटवर अचूक हल्ला करते.
याच प्रीडेटर ड्रोनद्वारे अमेरिकेने इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांची हत्या केली होती. असे 15 ड्रोन इंडीयन नेव्हीला आणि प्रत्येकी आठ वायू सेना आणि लष्कराला दिले जाणार आहेत. पाकिस्तान आणि चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी यांचा वापर केला जाणार आहे. यावर लावलेली हेलफायर मिसाईल आणि लेझर गायडेड स्मार्ट बॉम्ब शत्रूंचा क्षणात नायनाट करण्यास सक्षम आहेत.