नवी दिल्ली | 18 ऑगस्ट 2023 : भारत आणि रशियामध्ये चंद्राच्या दक्षिण भागात सर्वात अगोदर उतरण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. दोन्ही देशांच्या चंद्रयान मोहीम चंद्राच्या अगदी जवळ आहे. तोच चंद्रमा नभात, म्हणत अनेकांनी चंद्रासोबत सुखदुखाची बोलणी केली आहे. आता थेट चंद्रावर जाऊनच हितगूज करण्यात येणार आहे. भारताच्या चंद्रयान-3 (Chandrayaan-3) चे लँडर विक्रम प्रपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झाले आहे. ते हळूहळू चंद्राच्या पृष्ठभाग जवळ करत आहे. चंद्रयान येत्या 23 ऑगस्टपर्यंत चंद्राच्या जमिनीवर उतरण्याचा इस्त्रोचा प्रयत्न आहे. तर रशियाच्या लुना-25 (Luna-25) 21 ते 23 ऑगस्ट दरम्यान चंद्रावर पोहचण्याची शक्यता आहे. भारताने चंद्रयान-3, 14 जुलै 2023 रोजी चंद्राकडे झेपावले होते. तर रशियाने या 10 ऑगस्ट रोजी चंद्राकडे कूच केली होती. चंद्राकडे अमेरिका, रशिया यांनी यापूर्वी कूच केली आहे. चीनने सुद्धा हा प्रयत्न केला आहे. पण भारताची ही मोहीम खर्चाच्या बाबातीत उजवी ठरली आहे. भारताने नासा आणि रशियाच्या तुलनेत ही मोहीम इतक्या स्वस्तात करण्याचा प्रयत्न यशस्वी करुन दाखवला आहे.
काय आहे वैशिष्ट्ये
चंद्रयान-3 ही भारताची चंद्रासाठीची तिसरी मोहीम आहे. रशियाने यापूर्वी 1976 मध्ये पहिल्यांदा चंद्राची भेट घेतली होती. रशियाच्या लुना-25 चे वजन 1,750 किलो आहे. तर चंद्रयान-3 चे वजन 3,800 किलो आहे. भारताची यापूर्वीची चंद्रयान मोहीम अगदी जवळ जाऊन लँडिंग करताना अपयशी ठरली होती. त्यावेळी सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. तर अमेरिकेला टक्कर देण्यासाठी रशिया आणि चीनने अंतराळात झेप घेतली आहे.
खर्चात मोठी तफावत
चंद्रयान-3 च्या खर्चाची जगभर चर्चा आहे. चंद्रयान-3 चे बजेट अवघे 615 कोटी रुपये आहे. तर लुना-25 च्या खर्चाची रशियाने वाच्यता केली नाही. पण एका रिपोर्टनुसार या मोहीमेचा खर्च जवळपास 1,600 कोटी रुपये आहे. रशियाचे मिशन हे भारताच्या तुलनेत जवळपास अडीच पट जास्त आहे. चंद्रयान-2 पेक्षा पण चंद्रयान-3 चा खर्च कमी आहे. चंद्रयान-2 प्रमाणेच चंद्रयान-3 मध्ये ऑर्बिटर नाही.
इस्त्रोने करुन दाखवले
भारतीय अवकाश संशोधन संस्था, इस्त्रोने (ISRO) स्वस्तात चंद्रावरील स्वारीचे स्वप्न प्रत्यक्षात करुन दाखवले. अवघ्या काही दशकांपूर्वी अंतराळ क्षेत्रासाठी अमेरिकेने भारताला तंत्रज्ञान नाकारले होते. पण भारतीय शास्त्रज्ञांनी अंतराळात लक्षणीय कामगिरी केली आहे. अनेक देश इस्त्रोच्या मदतीने त्यांचे सॅटेलाईट अंतराळात पाठवत आहेत.
चंद्रयान-3 साठी खर्च किती
चंद्रयान-3 तयारी करण्यासाठी इस्त्रोला एकूण 615 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. चंद्रयान-3 चे लँडर विक्रम, रोवर प्रज्ञान आणि प्रपल्शन मॉड्यूल तयार करण्यासाठी एकूण 250 कोटी रुपयांचा खर्च आला. चंद्रयान-2 च्या तुलनेत हा खर्च जवळपास 30 टक्के कमी आहे. 2008 मधील चंद्रयान-1 साठी भारताने 386 कोटी रुपये खर्च केले होते. 2019 मधील चंद्रयान-2 मोहीमेसाठी एकूण 978 कोटी रुपयांचा खर्च आला होता. या तीनही मोहीमांसाठी एकूण 1,979 कोटी रुपयांचा खर्च आला.
नासाला किती आला होता खर्च
अमेरिकेने लुनर मिशन 1960 मध्ये यशस्वी केले होते. त्यासाठी एकूण 25.8 अब्ज डॉलरचा खर्च आला होता. आताच्या स्थिती ही किंमत 178 अब्ज डॉलर इतकी होती. भारतीय रुपयांत हा खर्च जवळपास 14 लाख कोटी रुपये होता. इस्त्रोच्या तुलनेत हा खर्च जवळपास 3,000 पट जास्त आहे.