नवी दिल्ली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपचे खासदार आणि रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्लीत स्थित जंतर-मंतरवर भारतीय कुस्ती फेडरेशन विरुद्ध विनेश फोगाट, बजरंग पूनिया, साक्षी मलिक आणि अन्य कुस्तीपटू हे आंदोलनाला बसले आहेत. बुधवारी 18 (जानेवारी) या कुस्तीपटूंनी नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर हुकूमशाहीचे आरोप लावत बृजभूषण सिंह याला पदावरुन दूर करण्याी मागणी केली जात आहे.
तसेच महिला कुस्तीपटू आणि ओलंपियन विनेश फोगाटने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेश केसरगंज लोकसभा मतदारसंघाचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केलाय.
बृजभूषण आणि महिला शिबिरात अन्य प्रशिक्षकाने कुस्तीपटूंचं लैंगिक शौषण केलंय. तसेच डब्ल्यूएफआयच्या अधिकाऱ्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही विनेश फोगाटने केला आहे.
“मी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितंल आहे. आता मला माहित नाही की तो (बृजभूषण) मला जगू देईल की नाही. मला वारंवार जीवे मारण्याची धमकी येत आहे”, अशी प्रतिक्रिया विनेश फोगाटने दिली.
महिला कुस्तीपटूंना विविध प्रकारच्या समस्या असतात. मात्र अध्यक्षांकडून महिला खेळाडूंचं शोषण करण्यात आलं. फेडरेशन जाणिवपूर्वक खेळाडूंवर बंदी टाकते, ज्यामुळे त्यांना खेळता येणार नाही. कोणत्याही खेळाडूला काहीही झालं तरी त्याला जबाबदार अध्यक्ष राहतील, असंही विनेश फोगाटने आरोप लावत आपली बाजू स्पष्ट केली.
फेडरेशनमध्ये बदल व्हायला हवा. कुस्तीपटूंना फेडरेशनकडून त्रास दिला जात आहे. जे डब्ल्यूएफआयचे भाग आहेत, त्यांना या खेळाबाबत काहीच माहिती नाही. तसेच जोवर डबल्यूएफआय अध्यक्षाला त्या पदावरुन हटवलं जात नाही, तोवर आम्ही कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार नाही”, असं बजरंग पूनिया म्हणाला.