मुंबई | 17 ऑगस्ट 2023 : भारताचे महत्वाकांक्षी चंद्रयान-3 मोहीम अंतिम टप्प्यात पोहचली आहे. तर दुसरीकडे रशियाने सोडलेल्या लूना-25 या चंद्रयानाने देखील चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. दोन्ही देशांचे चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच सॉफ्ट लॅंडींग करणार आहे. दरम्यान भारताच्या चंद्रयान-3 मोहीम महत्वाच्या वळणावर पोहचली असून प्रॉपल्शन मॉड्यूल पासून लॅंडींग मॉड्यूल गुरुवारी दुपारी वेगळे झाले असून आता लॅंडींग मॉड्यूल चंद्रावर लॅंडींग करण्याच्या दिशेने निघाले आहे. भारताचे चंद्रयान-3 येत्या 23 ऑगस्ट 2023 रोजी दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींग करणार आहे. तर रशियाचं लूना-25 देखील त्याच दरम्यान दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे.
अंतराळात भारत आणि रशिया यांच्या चंद्रयान मोहीमा महत्वाच्या टप्प्यावर आहेत. पुढच्या आठवड्यात भारत आणि रशिया दोन्ही देशाचं चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींग करणार आहे. दोन्ही चंद्रयान मोहीमाचं स्वतंत्र महत्व असून वैशिष्टये आहेत. दरम्यान, भारताच्या चंद्रयान-3 चा चंद्राच्या कधीही न दिसणाऱ्या दक्षिण ध्रुवावर प्रथमच 23 ऑगस्ट 2023 रोजी लॅंडींग करण्याचा प्रयत्न होता. परंतू रशियाच्या लूना-25 यानाच्या मोहिमेमुळे दोघांच्या तारखा ओव्हरलॅप होण्याची शक्यता आहे. भारताचे यान 23 वा 24 ऑगस्ट रोजी तर रशियाचे यान 21 ते 23 ऑगस्ट दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींग करण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
चंद्रयान-3 ही भारताचे तिसरी चंद्र मोहीम असून यंदाच्या 14 जुलै रोजी त्याचे आंध्रातील श्रीहरिकोटा येथून उड्डाण झाले होते. आणि 5 ऑगस्ट रोजी त्याने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. लॉंचिंगच्या 40 दिवसानंतर चंद्रयान-3 यानाने बुधवारी चंद्राची पाचवी आणि अंतिम कक्षा गाठत चंद्राच्या जवळ पोहचले आहे. त्याच्या प्रॉपल्शन मॉड्यूल पासून लॅंडींग मॉड्यूलही गुरुवारी दुपारी वेगळे झाले आहे. चंद्रयान-3 येत्या 23 ऑगस्ट रोजी सॉफ्ट लॅंडींग करणार आहे.
रशियाचे लूना-25 हे यान 1976 नंतर सुमारे पन्नास वर्षांच्या अंतराने चंद्राकडे चालले आहे. 11 ऑगस्ट रोजी उड्डाण होऊनही थेट 11 दिवसात ते चंद्रावर 21 ऑगस्ट रोजी लॅंडींग करणार आहे. रशियाच्या यानाचं वजन केवळ 1,750 किलो आहे तर भारताच्या यानाचे वजन तब्बल 3,900 किलो असल्याने भारताच्या तुलनेत रशियाला सॉफ्ट लॅंडींग करताना सोपे पडणार असल्याचे इस्रोच्या शास्रज्ञांनी म्हटले आहे. रशियाच्या यानाच्या तुलनेत भारताचे यान केवळ 615 कोटी रुपयात तयार झालं आहे.