26 डिसेंबर 2004… ग्रेट निकोबार परिसरात 9.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता आणि इथूनच इतिहासातील सर्वात विनाशकारी त्सुनामीला सुरवात झाली. 20 वर्षांपूर्वी या त्सुनामीने 12 किनारी देशांना तडाखा दिला होता. त्यात किमान 2 लाख लोकांचा मृत्यू झाला. केंद्र सरकार सुंदर प्रवाळ खडकांनी वसलेल्या ग्रेट निकोबार प्रकल्पाचे मिशन पूर्ण करण्यात व्यस्त आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास भारतात हाँगकाँगसारखे एक नवीन शहर विकसित होईल अशी अपेक्षा आहे. मात्र, काँग्रेस आणि पर्यावरणवाद्यांनी या प्रकल्पाबाबत चिंता व्यक्त केली आहे. तर, भारताने हा प्रकल्प सुरू केल्यापासून चीन प्रचंड नाराज झाला आहे. काय आहे हा ग्रेट निकोबार प्रकल्प?
नरेंद्र मोदी सरकारने 2021 मध्ये ग्रेट निकोबार बेट प्रकल्प सुरू केला होता. 72,000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. निकोबार बेटाच्या दक्षिणेकडील आणि बंगालच्या उपसागरात 910 चौरस किमी परिसरात हा प्रकल्प बांधला जात आहे. ग्रेट निकोबार बेट भारताच्या मुख्य भूभागाच्या पूर्वेस सुमारे 1,800 किलोमीटर अंतरावर आहे. या बेटावर इंदिरा पॉइंट देखील आहे जे इंडोनेशियातील सर्वात मोठे बेट सुमात्रापासून फक्त 170 किमी अंतरावर आहे. हा मेगा प्रोजेक्ट अंदमान आणि निकोबार बेटांच्या शेवटच्या टोकापर्यंत बांधला जाणार आहे.
ग्रेट निकोबार प्रकल्पामध्ये मालवाहू जहाजांसाठी बंदर उभारणे, आंतरराष्ट्रीय विमानतळ, स्मार्ट सिटी, 450 मेगावॅटचा गॅस आणि सौर ऊर्जा प्रकल्प यांचा समावेश आहे. NITI आयोगाच्या अहवालाच्या आधारे हा प्रकल्प तयार केला जात आहे. प्रकल्पाचा काही भाग श्रीलंकेची राजधानी कोलंबो, मलेशियाचे पोर्ट क्लांग आणि सिंगापूरपासून समान अंतरावर असल्याचे सांगितले जात आहे.
अंदमान निकोबार हे बेटे 836 लहान मोठ्या बेटांनी बनलेली आहेत. दोन भागांमध्ये हे बेत विभागले आहे. उत्तरेला अंदमान बेटे आणि दक्षिणेला निकोबार बेट आहे. ग्रेट निकोबारमध्ये दोन राष्ट्रीय उद्याने आहेत. यात एक बायोस्फीअर राखीव आहे. शॉम्पेन, ओंगे, अंदमानी आणि निकोबारी जमाती येथे राहतात. याशिवाय काही बिगर आदिवासी लोकही येथे राहतात. सध्या या बेटावर आठ हजार लोक राहतात.
ग्रेट निकोबार प्रकल्पाद्वारे भारताला या प्रदेशात अतिरिक्त सैन्यदल तसेच युद्धनौका, युद्ध विमाने आणि क्षेपणास्त्रे तैनात करणे शक्य होणार आहे. आपली राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेऊन भारताला या संपूर्ण भागातून हिंदी महासागरावर लक्ष ठेवता येणार आहे. मलाक्का आखाताच्या अगदी जवळ हा प्रकल्प आहे. याच खाडीतून हिंद महासागर आणि पॅसिफिक महासागरात जहाजे जातात. मलाक्का, सुंदा आणि लोंबकचे आखात यासारख्या भारतापर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक सागरी चेक पॉइंट्सवर चीनने आपली नौदल उपस्थिती वाढवली आहे. अंदमान-निकोबार बेटांपासून अवघ्या 55 किलोमीटर अंतरावर असलेल्या म्यानमारच्या कोको बेटावर चीनने लष्करी केंद्र बांधले आहे. भारतासाठी ही अत्यंत तणावाची बाब आहे. मात्र, हा प्रकल्प पूर्ण झाल्यास चीनच्या अस्तित्वाला धोका पोहोचू शकतो. त्यामुळेच या प्रकल्पामुळे चीन नाराज झाला आहे.
ग्रेट निकोबार प्रकल्पाच्या उभारणीमुळे सुमारे 10 लाख झाडांचा बळी दिला जाणार आहे. त्यामुळे तेथे मोठे पर्यावरणीय संकट निर्माण होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. याशिवाय अगोदरच नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या शोंपेन आणि निकोबारी या जमातीही नामशेष होण्याचा धोका आहे. शॉम्पेन जमात आजही शिकार करून आपला उदरनिर्वाह करते. हा प्रकल्प वनहक्क कायदा 2006 चे उघड उल्लंघन मानला जात आहे. ज्या अंतर्गत शॉम्पेन जमात ही येथील जंगलांची खरी मालकी आहे. पण, आजमितीस या जमातीची लोकसंख्या फक्त 300 इतकीच उरली आहे. त्यामुळेच या प्रकल्पाला विरोध होता आहे.