भारतीयांचं आर्युमान (Life Expectancy in India) दोन वर्षांने वाढलंय. भारतीयांचं सरासरी वय हे 69.7 वर्ष असल्याचा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. 2015 ते 2019 च्या काळात भारतीयांच्या वयात वाढ झाली असल्याचा अहवाल समोर आलाय. भारतीयांच्या आर्युमानात (Life) दोन वर्षांची वाढ होण्यासाठी जवळपास दहा वर्ष लागली आहेत. पाच वर्षांखालील मुलांचे मृत्यू आणि जन्मावेळी होणारे मृत्यू, ही आर्युमान अत्यंत संथ गतीने वाढण्यामागील मुलभूत कारणं असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या दोन प्रश्नांवर काम केलं गेल्यास भारतीयांचं आयुष्य आणखी वेगानं वाढू शकतं, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवलाय. भारतीयांचं आर्युमान वाढलं असलं, तरी ते सरासरी जागजित आर्युमानापेक्षा कमीच असल्याचंही दिसून आलंय. जगाचं (World life Expectancy) सरासरी आर्युमान 72.6 इतकं आहे, तर भारतीयांचं सरासरी आर्युमान 69.7 इतकं नोंदवलं गेलंय.
जन्मवेळी अर्भकाचा मृत्यू होणं, किंवा पाच वर्ष वयाच्या आत मृत्यू होण्याचं प्रमाण मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात सर्वाधिक आहे. गेल्या 45 वर्षात भारतीयांचं आर्युमान 20 वर्षांनी वाढलं असल्याचं अहवालातून स्पष्ट झालंय. 1970-75 मध्ये जन्मावेळी असलेलं सरासरी आर्युमान हे 49.7 वर्ष इतकं होतं. ते आता 69.7 वर्ष इतकं झालंय. ‘एसआरएस एब्रिज्ड लाईफ टेबल्स 2015-2019’च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. टाईम्स ऑफ इंडियानं याबाबतचं वृत्त दिलंय.
पुरुष | महिला | एकूण | |
---|---|---|---|
दिल्ली | 74.3 | 77.5 | 75.9 |
केरळ | 72.3 | 78 | 75.2 |
जम्मू काश्मीर | 72.6 | 76.1 | 74.2 |
हिमाचल प्रदेश | 69.9 | 77.1 | 73.1 |
पंजाब | 71.1 | 74.7 | 72.8 |
महाराष्ट्र | 71.6 | 74 | 72.7 |
तमिळनाडू | 70.6 | 74.9 | 72.6 |
प. बंगाल | 71 | 73.2 | 72.1 |
उत्तराखंड | 67.6 | 73.9 | 70.6 |
आंध्र प्रदेश | 68.9 | 71.8 | 70.3 |
गुजरात | 67.9 | 72.8 | 70.2 |
हरियाणा | 67.7 | 72.6 | 69.9 |
ओडिशा | 68.5 | 71.1 | 69.8 |
कर्नाटक | 67.9 | 71.3 | 69.5 |
झारखंड | 70.2 | 68.8 | 69.4 |
बिहार | 69.6 | 68.8 | 69.2 |
राजस्थान | 66.8 | 71.3 | 69 |
आसाम | 66.8 | 68.3 | 67.5 |
मध्य प्रदेश | 65.2 | 69.1 | 67 |
उत्तर प्रदेश | 65 | 66.2 | 65.6 |
छत्तीसगड | 63.7 | 66.9 | 65.3 |
भारत | 68.4 | 71.1 | 69.7 |
ग्रामीण आणि शहरी भागात तफावत
भारतातील बहुतांश राज्यात शहरी आणि ग्रामीण भागात प्रचंड तफावत असून त्याचाही परिणाम आर्युमानाच्या आकडेवारीवर पाहायला मिळाला आहे. आसाममध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील आर्युमान हे आठ वर्षांचं आहे. तर उत्तराखंडमध्ये आर्युमान कमी झाल्याचंही दिसून आल्यानं चिंताही व्यक्त केली जातेय. 2010 ते 2014 मध्ये उत्तराखंडमध्ये आयुर्मान 71.4 इतकं होतं. ते 2015-19 मध्ये घटलं असून आता ते 70.6 वर आलंय.