दीड वर्षांपासून तुरुंगात, मतदारसंघातही गेले नाही, काँग्रेसने उमेदवारी दिली आणि ते जिंकलेही

| Updated on: May 13, 2023 | 10:45 PM

न्यायालयाने त्यांच्यावरील बंदी कायम ठेवली होती. न्यायालयाच्या निर्णयामुळे विनय कुलकर्णी यांच्यासमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता. त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीही मतदारसंघात जाता आले नव्हते.

दीड वर्षांपासून तुरुंगात, मतदारसंघातही गेले नाही, काँग्रेसने उमेदवारी दिली आणि ते जिंकलेही
Follow us on
बेंगळुरु : मुळात विनय कुलकर्णी यांना धारवाड (Dharwad) जिल्‍ह्यात प्रवेश करण्यास बंदी आहे. काँग्रेस (Congress) पक्षाने त्यांना उमेदवारी दिली होती. शिवाय धारवाड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली. त्यामुळे धारवाड जिल्ह्यातील प्रवेश बंदी उठविण्याच्या मागणीसाठी कुलकर्णी यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. पण न्यायालयाने त्यांच्यावरील बंदी कायम ठेवली होती. न्यायालयाच्या निर्णयामुळे विनय कुलकर्णी यांच्यासमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता. त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीही मतदारसंघात जाता आले नव्हते. त्यांच्या वतीने पत्नी शिवलिला यांनी कार्यकर्त्यांसह जाऊन अर्ज दाखल केला होता.

मतदारांमध्ये सहानुभूती

त्यानंतर इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी मतदारांसोबत ऑनलाईन संपर्क साधला. पण या सर्व घटनांमुळे कुलकर्णी यांच्याबद्दल मतदारांमध्ये सहानुभूती निर्माण झाली. त्याचाही फायदा कुलकर्णी यांना झाला. कुलकर्णी यांना 89 हजार 333 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी व भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमृत देसाई यांना 71 हजार 219 मते मिळाली.

हत्या प्रकरणी कुलकर्णी यांचे नाव

2013 निवडणुकीत विनय कुलकर्णी यांचा पराभव झाला होता. अमृत देसाई यांनीच त्यांचा पराभव केला होता. निवडणुकीआधी काही वर्षे म्हणजे 15 जून 2016 रोजी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा पंचायत सदस्य योगेश गौडा यांची धारवाड येथे हत्या झाली होती. त्यावेळी विनय कुलकर्णी हे मंत्री होते. या हत्या प्रकरणाशी त्यावेळी कुलकर्णी यांचे नाव जोडण्यात आले होते.

दीड वर्षांपासून कारागृहात

राज्यात 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. त्यावेळी योगेश गौडा हत्या प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले. सीबीआयकडून त्यावेळी कुलकर्णी यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणी डिसेंबर 2020 मध्ये कुलकर्णी यांना अटक करण्यात आली. सुमारे दीड वर्षे कुलकर्णी हे बेळगावातील हिंडलगा कारागृहात होते. ऑगस्ट 2022 मध्ये कुलकर्णी यांना जामीन मिळाला होता. पण, न्यायालयाने धारवाड जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली होती. पण, बंदी असूनही कुलकर्णी लढले आणि जिंकलेही.

पत्नी, मुलांनी सांभाळली बाजू

एकही दिवस मतदारसंघात न जाता माजी मंत्री तथा काँग्रेसचे उमेदवार विनय कुलकर्णी यांनी धारवाडची लढाई जिंकली आहे. जिल्हा पंचायत सदस्य योगेश गौडा हत्या प्रकरणी संशयित आरोपी असलेल्या कुलकर्णी यांना न्यायालयाने धारवाड जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे कुलकर्णी यांना मतदारसंघात प्रचारासाठी जाता आले नाही. त्यांच्या पत्नी शिवलिला, तीन मुले आणि कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून कुलकर्णी यांना निवडून आणले आहे. त्यामुळे कुलकर्णी यांचा विजय राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे.