नवी दिल्ली : 16 ऑक्टोबर 2023 | प्रत्येक यशाबरोबर नवीन उंची गाठण्याची संधी मिळत असते. पण, त्या संधीचे सोने करण्याची ताकद काही ठराविक जणांमध्येच असते. तनुश्री यांनीही असेच धाडस केले. आपल्या ध्येयांबद्दल त्या जागरूक होत्या. एक ध्येय गाठले म्ग्ग दुसरे, मग तिसरे असे करता करता त्यांनी यशाची एकेक पायरी चढली. केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) असिस्टंट कमांडंट, नंतर आयकर अधिकारी आणि त्याही पुढे जाऊन आयपीएस असा त्यांचा हा प्रवास आहे. कोण आहेत या तनुश्री?
तनुश्री यांचे प्राथमिक शिक्षण बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यात झाले. त्यांचे वडील सुबोध कुमार हे डीआयजी होते. वडिलांचा आदर्श नजरेसमोर ठेऊन तनुश्री यांनी आपली वाटचाल सुरु केली. बोकारो येथील डीएव्ही पब्लिक स्कूलमधून त्यांनी बारावीचे शिक्षण पूर्ण केले. वडिलांची पोस्टिंग सतत बदलत होती. या काळात त्या वेगवेगळ्या संस्थांना भेट द्यायच्या.
बारावीनंतर त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी दिल्ली गाठली. प्रशिक्षणासोबतच त्यांनी स्वयंअभ्यासावरही भर दिला. मोठी बहीण मनुश्री यासुद्धा सीआरपीएफ कमांडंट आहेत. 2015 मध्ये तनुश्री यांचे लग्न झाले. पण, आपले ध्येय साध्य करण्यात त्या कुठेही कमी पडल्या नाही. घरगुती जबाबदाऱ्या कुशलतेने पार पडून त्या पुढील तयारी करत होत्या. तनुश्री यांच्या संपूर्ण प्रवासात मोठी बहिण मनुश्री यांचे खूप मोठे योगदान आहे. आपल्या धाकट्या बहिणीला त्यांनी खूप प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले.
2014 मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) तनुश्री असिस्टंट कमांडंट म्हणून सेवेते दाखल झाल्या. या महत्त्वपूर्ण कामगिरीनंतर त्यांनी विश्रांती न घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वत:साठी आणखी आव्हानात्मक लक्ष्य समोर ठेवले. हे लक्ष्य होते UPSC परीक्षेत यश मिळवण्याचे. त्यांनी अत्यंत मेहनत घेतली. 2016 मध्ये UPSC परीक्षा दिली आणि मे 2017 मध्ये त्यांचे स्वप्न पूर्ण झाले.
प्रशासकीय सेवेत त्या आयकर विभागात अधिकारी म्हणून जॉईन झाल्या. पण, त्यांनी आणखी पुढे जायचे ठरवले. हैदराबादमधील प्रतिष्ठित पोलीस अकादमीत त्यांनी आयपीएसचे प्रशिक्षण घेतले. आयपीएस केडरमध्ये त्या रुजू झाल्या. प्रशिक्षणादरम्यान त्यांना जम्मू-काश्मीरचे लोकेशन देण्यात आले. हिजबुल मुजाहिद्दीन कमांडर जुनैद याला पकडण्याच्या दहशतवादविरोधी ऑपरेशनमध्ये त्यांनी भाग घेतला. पण, या कारवाईत दहशतवादी जुनैद मारला गेला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी या अधिकाऱ्यांना पंतप्रधान मोदी यांनी लोकशाही आणि योगाचे महत्त्व समजावून सांगितले. याच संवादात तनुश्री यांनी पंतप्रधान मोदी यांना सांगितले, मी बिहारची आहे. पण, गांधीनगरमधून टेक्स्टाईल डिझाइनमध्ये पदवी पूर्ण केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी तुम्हीही गुजरातमार्गे आला आहात. मग, कापड आणि दहशतवाद यामध्ये तुम्ही कसे टिकणार? यावर उत्तर देताना तनुश्री यांनी मला खूप चांगले प्रशिक्षण मिळाले आहे असे सांगितले. त्यानंतर मोदी यांनी कापडात धागे जोडले जातात. पण, दहशतीत धागे तुटतात. तुम्हाला वेगवेगळ्या पैलूंवर काम करावे लागेल, असे समजावून सांगितले.