जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) यांनी नुकतीच मायक्रो ब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटर (Twitter) ची खरेदी केली आहे. त्यांनी तब्बल 44 अब्ज डॉलरमध्ये ट्विटर खरेदी केले. सध्या या व्यवहाराला अंतिम स्वरूप देण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशातच सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawala) यांनी एलॉन मस्क यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. अदार पूनावाला यांनी ट्विट करत मस्क यांना हा सल्ला दिला. पूनावाला यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जर एलॉन मस्क कोणत्याही कारणामुळे जर ट्विटर खरेदी करू शकले नाहीत, तर त्यांनी तो पैसा भारतामध्ये गुंतवावा. तुम्ही इथे टेस्ला कारचा एखादा चांगला मोठा कारखाना उघडू शकता. मी तुम्हाला विश्वास देतो की, ही तुमची सर्वात चांगली गुंतवणूक असेल, तुमची निराशा होणार नाही. असे अदर पुनावाला यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान भारतातील अनेक राज्यांकडून त्यांना टेस्ला कारच्या फॅक्टरीसाठी ऑफर देण्यात आली आहे. भारतात टेस्ला कारची निर्मिती व्हावी असे केंद्र सरकारला देखील वाटते. सध्या मस्क आणि केंद्र सरकारमध्ये यावर चर्चा सुरू आहे. केंद्राकडून त्यांना भारतात गुंतवणूक करण्याची ऑफर देण्यात आली आहे. भारतात इलेक्ट्रिक कारचे मार्केट वाढत असताना देखील अद्यापही एलॉन मस्क यांनी भारतात टेस्ला कार निर्मिती बाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. ज्या कार तयार आहेत, त्या कार भारतात विकण्याची व त्यावरील आयात शुल्कात सुट देण्याची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. मात्र केंद्र सरकार यासाठी तयार नसून, मस्क यांनी भारतात थेट गुंतवणूक करावी अशी मागणी केंद्राकडून करण्यात आली आहे.
Hey @elonmusk just in case you don’t end up buying @Twitter, do look at investing some of that capital in INDIA for high-quality large-scale manufacturing of @Tesla cars. I assure you this will be the best investment you’ll ever make.
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) May 8, 2022
दरम्यान ट्विटर खरेदी केल्यानंतर मस्क यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भविष्यात ट्विटर कदाचित पेड होऊ शकते. मात्र जे सामान्य वापरकर्ते आहेत त्यांच्यासाठी ते कायम फ्री राहील. जे व्यक्ती अथवा संस्था ट्विटरचा उपयोग व्यवसायिक कामासाठी करतील त्यांच्याकडून भविष्यात पैसे आकारले जाऊ शकतात, असा सूचक इशारा मस्क यांनी दिला आहे. सोबतच ते ट्विटरमध्ये काही नवे फीचर विकसीत करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.