चंदीगड : स्वयंघोषीत खलिस्तानी धर्मोपदेशक अमृतपाल सिंह याला अखेर रविवार सकाळी अटक करण्यात येऊन त्याची रवानगी विमानाने पंजाबपासून अनेक मैल दूर असलेल्या आसामच्या दिगबुड जेलमध्ये करण्यात आली आहे. त्याच्या अटकेपूर्वी रविवारी त्याने रेकॉर्डेड संदेशात आपल्याकडे परदेशात पळून जाण्यासह सर्व पर्याय खले असताना आपण स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी मात्र त्याचा दावा खोडून काढताना आम्ही त्याला घेरून मोगा येथून अटक केल्याचे म्हटले आहे.
अमृतपाल याचा व्हिडीओ संदेश सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. मोगा येथील रोडे गावातील गुरुद्वारात रविवारी सकाळी त्याला अटक झाली त्यापूर्वी त्याने हा संदेश रेकॉर्ड करून सोशल मिडीयात जाणीवपूर्वक पसरला आहे. या व्हिडीओ संदेशात वारीस दे पंजाबचा वादग्रस्त प्रमुख 30 वर्षीय अमृतपाल सिंह याने असा दावा केला आहे की आपल्या समर्थकांवर राज्य पोलिसांनी अत्याचार करीत दबाव आणल्याने आपण एक महिन्यानंतर स्वत: हून पोलिसांच्या स्वाधीन झालो आहोत. मात्र, पोलिसांनी अमृतपाल याच्या दाव्याला खोडून काढत त्याला पोलिसांनी गुरूद्वाराला घेराव खालूनच बाहेर यायला भाग पाडल्याचे म्हटले आहे.
अमृतपाल सिंह गेल्या 18 मार्च पासून फरार होता. त्याच्या शोधासाठी पोलीसांनी जंगजंग पछाडले. अखेर पोलिसांनी खूप व्यापक सर्च ऑपरेशन राबवून त्याच्या सात साथीदारांना वेचून अटक केली. खलिस्तान चळवळीचा समर्थक असलेला अपहरण आणि मारहाणीच्या आरोपाखाली अटक केलेल्या त्यांच्या एका साथीदाराला सोडावे या मागणीसाठी अमृतपाल सिंह याच्या नेतृत्वाखाली शेकडो समर्थकांनी 23 फेब्रुवारी रोजी अमृतसर येथील अंजनाला येथे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत मोठा हिंसाचार केला होता. फेब्रुवारीपासून अमृतपाल सिंह याच्यावर किमान सहा गुन्हे दाखल केले आहेत.
शनिवारी रात्री साडे बारा वाजता पंजाब पोलीसातील कोणीतरी आपल्याला फोन करून अमृतपाल सिंह सरेंडर करीत असल्याचे सांगितल्याचे अकाल तख्तचे माजी जथेदार जसबीर सिंह रोडे यांनी दि प्रिंटशी बोलताना सांगितले.
80 च्या दशकात स्वतंत्र खलीस्तान चळवळीतील अग्रणी भिंद्रनवाले याची अमृतपाल कॉपी करत असल्याचा त्याच्यावर आरोप होतो. 1980 च्या दशकात पंजाबमध्ये फुटीरतावादी चळवळीने जोम धरला होता. खलीस्तान म्हणजेच वेगळ्या पंजाबच्या मागणीसाठी जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पुकारण्यात आले होते. भिंद्रनवाले याने त्याच्या समर्थकांसह सुवर्ण मंदीराचा ताबा घेतला होता. त्यांना बाहेर हुसकावून काढण्यासाठी झालेल्या ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ मोहीमेमुळे देशाचा एक पंतप्रधान, एक माजी लष्कर प्रमुख यांच्या प्राणांची आहुती द्यावी लागली आणि एक राज्य अस्थिर झाले होते.