भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांच्या अंतराळ स्थानकात अडकल्याच्या बातम्यांनी जगभरात खळबळ उडाली आहे. या संदर्भात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख ( ISRO ) एस.सोमनाथ यांनी सुनीता विल्यम्स यांच्या अंतराळ स्थानकातील अडकण्याच्या घटनेवर चांगली बातमी दिली आहे. सोमनाथ म्हणाले की त्यांच्या परतण्यात काही अडचणी येणार नाहीत. त्यामुळे काहीही चिंता करण्याची आवश्यकता नसल्याचे इस्रो प्रमुख एस.सोमनाथ यांनी म्हटले आहे.
मूळच्या गुजरातच्या परंतू अमेरिकेच्या नागरिक असलेल्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेल्या आहेत. त्यांना आणणारे अंतराळ यान चौथ्यांदा बिघडले असल्याने त्यांचे पृथ्वीवर येणे पुढे ढकलले आहे. यासंदर्भात इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ म्हणाले की मुळात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अनेक अंतराळवीर संशोधनासाठी मुक्काम करीत असतात. सुनिता विल्यम्स सोबत अन्य अंतराळवीर देखील आहेत. अंतराळ स्थानक अनेक महिन्यांच्या मुक्कामाला योग्य असते असेही सोमनाथ यांनी सांगितले.
एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत इस्रो प्रमुख म्हणाले की केवळ सुनिता वा कोणा अन्य अंतराळवीराची ही गोष्ट नाही. त्यांना कोणत्या ना कोणत्या दिवशी परतायचं असतेच. हा मुद्दा बोईंग स्टारलायनर नावाच्या एका नवीन क्रु मॉड्युलच्या चाचणीचा आहे. अंतराळ यानाला तेथे पोहचविणे आणि सुरक्षित परत आणण्याच्या क्षमता तपासण्या बाबतचा आहे. स्पेस एजन्सीकडे त्यांना परत आणण्याची संपूर्ण क्षमता आहे. आयएसएस ( आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक ) मोठ्या काळासाठी अंतराळात राहण्यासाठी तयार केलेले असते असेही त्यांनी सांगितले.
नासाचे दोन अंतराळवीर बॅरी विल्मोर आणि सुनिता विल्यम्स 14 जून रोजी पृथ्वीवर परत येणार होते. बोईंगच्या स्टारलायनर अंतराळ यानात अनेक समस्या आल्या आहेत. त्यामुळे अंतराळवीरांना परत आणण्याची योजना बारगळी आहे. अंतराळवीरांच्या परतण्याची काळजी करण्यापेक्षा नवीन क्रु मॉड्युलच्या चाचण्या आणि अंतराळात पोहचण्याच्या त्याच्या क्षमतेवर विचार केला पाहीजे. सुनिता विल्यम्स यांच्या नवीन अंतराळ यानातून पहिल्यांदा उड्डाण करण्याच्या धाडसाचे कौतूक केले पाहीजेत असेही सोमनाथ यांनी सांगितले. आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो. त्यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्या स्वत: डिझाईन टीमचा एक भाग होत्या. त्यांनी त्यांच्या अनुभवाचा वापर हे मिशन राबविताना केला आहे.
अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या दोन अंतराळवीरांचा आयएसएसवर आणखी मुक्काम वाढला आहे. कारण बोईंगच्या नवीन अंतराळ कॅप्सुलला काही समस्या आल्या आहेत. त्यावर उत्तर शोधले जात आहे. नासाने अंतराळवीरांना परत आणण्याच्या मोहीमेसंदर्भात कोणतीही नवीन तारीख जाहीर केलेली नाही. ते सर्व सुखरुप असल्याचे म्हटले आहे. नासाचे वाणिज्यिक चालक दल कार्यक्रम मॅनेजर स्टीव स्टीच यांनी सांगितले की आम्हाला परतण्याची कोणतीही घाई नसल्याचे म्हटले आहे. नासाच्या अनुभवी परीक्षण पायलट सुनिता विल्यम्स आणि बूच विल्मोर अंतराळात फिरणाऱ्या प्रयोगशाळेत पाच जून रोजी बाईंग कंपनीच्या स्टारलायनरने गेले होते. विल्यम्स आणि विल्मोर यांना घेऊन बोईंगचा क्रू फ्लाईट टेस्ट मिशन अनेक वर्षांच्या प्रतिक्षा आणि अपयशानंतर अमेरिकेच्या फ्लोरिडाच्या कॅनवेरल स्पेस फोर्स स्थानकावरुन रवाना झाला होता.