नवी दिल्ली | 17 फेब्रुवारी 2024 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. शनिवारी संध्याकाळी सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरीकोटा येथून जिओसिंक्रोनस लॉन्च व्हेईकल F14 (GSLV-F14) वर INSAT-3DS हवामान उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. शुक्रवारी दुपारी अडीच वाजता याचे काउंटडाऊन सुरू झाले होते. INSAT-3DS हा तिसऱ्या पिढीतील हवामानाचा अंदाज वर्तवणारा उपग्रह यशस्वीरित्या त्याच्या कक्षेत ठेवण्यात आला.
प्रगत हवामानविषयक माहिती, हवामान अंदाज, जमीन आणि महासागराच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करणे, येणाऱ्या संकटांची सूचना देणे, उपग्रह सहाय्यित संशोधनासाठी विद्यमान उपग्रहांना INSAT-3D आणि INSAT-3DR सतत सेवा देणे हे या उद्दिष्टाने हे उपग्रह बनविण्यात आले आहे. सुमारे 20 मिनिटांच्या उड्डाणानंतर तीन टप्प्यांनंतर INSAT-3DS रॉकेटपासून वेगळे झाले. 1 जानेवारी रोजी PSLV-C58/Exposet मिशनच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता 2024 मध्ये ISRO ची ही दुसरी मोठी मोहीम आहे.
भारतीय हवामान विभाग, नॅशनल सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फोरकास्टिंग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी, इंडियन नॅशनल ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस सेंटर यासारख्या भूविज्ञान मंत्रालयाच्या विविध विभाग, संस्था हवामानाचा अंदाज देतात. मात्र, त्यांचे अंदाज अनेकदा चुकतात. अशावेळी INSAT-3DS द्वारे देण्यात येणारी माहिती ही अचूक असेल असा दावा इस्रोने केला आहे. तसेच, INSAT-3DS चे आयुष्य अंदाजे 10 वर्ष असेल अशी माहितीही इस्रोने दिलीय.
इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी GSLV पुढील NISAR मिशनमध्ये तैनात केले जाईल. यूएस स्पेस एजन्सी आणि NASA यांचा हा एक सहयोगी प्रयत्न आहे. या यशामुळे अंतराळ संस्थेला अधिक आत्मविश्वास मिळाला आहे. आम्हाला हे सांगताना अतिशय आनंद होत आहे की, आम्ही इन्सॅट-३डीएस३ मिशन यशस्वीपणे प्रक्षेपित केले आहे. हा उपग्रह त्याच्या कक्षेत ठेवण्यात आला आहे. त्याची कामगिरी चांगली आहे. या कामात सहभागी असलेल्या सर्वांचे मी अभिनंदन करतो असेही ते म्हणाले.
इस्रोच्या या यशाबद्दल केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले, हवामान उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण ही आनंदाची घटना आहे. पीएम मोदी यांच्या नेतृत्वाखाली इस्रो अनेक इतिहास रचत आहे. अशा वेळी इस्रोमध्ये सामील होणे ही अभिमानाची बाब आहे असे त्यांनी सांगितले.