नवी दिल्ली | 17 सप्टेंबर 2023 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) चंद्रयान-3 आणि मिशन आदित्याने जगभरात भारताची मान उंचावली. अंतराळ क्षेत्रात इस्त्रोचा दबदबा वाढला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदा उतरण्याचा मान चंद्रयान-3 मोहिमेने (Chandrayaan-3) पटकावला. त्यानंतर लागलीच भारताने सूर्याला गवसणी घालण्यासाठी आदित्य एल 1 चे पण यशस्वी प्रक्षेपण केले. इस्त्रोवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. इस्त्रोला आणि सहयोगी कंपन्यांना अनेक मोठ-मोठ्या ऑर्डर मिळत आहेत. काही वर्षांत मून इकोनॉमी आणि स्पेस इकोनॉमीत भारत हा मोठा हिस्सेदार असेल असा दावा करण्यात येत आहे. पण लाँचपँड (Launchpad)तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी चहा आणि इडली विकावी लागत आहे.
इतक्या कर्मचाऱ्यांना वेतनच नाही
चंद्रयान-3 मोहिमेतील अनेक कर्मचाऱ्यांना अजूनही वेतन मिळालेले नाही. त्यांनी या मोहिमेत लाँचपॅड तयार केले होते. या कर्मचाऱ्यांना गेल्या 18 महिन्यांपासून वेतनच देण्यात आलेले नाही. त्यानाराजीने कर्मचाऱ्यांनी आंदोलन पण केले. रांचीमधील धुर्वा येथील हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (HEC) 2800 कर्मचाऱ्यांना गेल्या 18 महिन्यांपासून पगारच देण्यात आले नसल्याचे बीबीसीने त्यांच्या वृत्तात स्पष्ट केले आहे. HEC हा केंद्राचा सार्वजनिक उपक्रम आहे. या केंद्राने चंद्रयान मोहिमेसाठी 810 टन लाँचपॅड तयार केले. त्यासह फोल्डिंग प्लॅटफॉर्म, डब्ल्यूबीएस, स्लाईडिंग दोर हे पण तयार करुन दिले.
इडली विक्रीतून उदरनिर्वाह
एचईसीमधील टेक्नेशिअन दीपक कुमार उपरारिया हे सध्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी इडली विक्री करत आहेत. रांची येथील धुर्वा परिसरातील जुन्या विधानसभेच्या समोर त्यांचा इडलीचा स्टॉल आहे. सकाळी ते इडली विक्री करतात. दुपारी एचईसीमधील कार्यालयात काम करतात. संध्याकाळी पुन्हा ते इडलीचा स्टॉल लावतात. अनेक कर्मचाऱ्यांना सध्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दुसरा व्यवसाय करावा लागत आहे. कोणी चहा विक्री करत आहे, तर कोणी इतर व्यवसाय. अनेकांच्या डोईवर लाखांचे कर्ज झाले आहे. उधार उसणे करुन कसा तरी घर खर्च भागवला. पण आता देणेकरी घरी येत असल्याने दुसरा व्यवसाय करावा लागत आहे.
एचईसी हा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून तोट्यात आहे. या सरकारी कंपनीची उलाढाल 356.21 कोटी रुपयांहून घसरुन 87.52 कोटी रुपयांवर आला आहे. HEC ला कर्मचाऱ्यांचे थकलेले वेतन अदा करण्यासाठी तातडीने 153 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. वीज, सुरक्षा आणि इतर खर्चापोटी 2000 कोटी रुपयांची गरज आहे.