उत्तराखंडच्या गरुडचट्टीमधील हेलिकॉप्टर दुर्घटना ताजी असतानाचा आता आणखी एक हेलिकॉप्टर कोसळलंय. ही घटना अरुणाचल प्रदेशमध्ये शुक्रवारी सकाळी घडली. अरुणाचल प्रदेशच्या सियांग जिल्ह्यात लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं असल्याची माहिती समोर आलीय. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील पायलट शहीद झाला. दरम्यान, केदारपासून 2 किमीच्या अंतरावर झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत पायलटसह सहा जणांचा जीव गेला होता. तीन दिवसांपूर्वी झालेल्या या दुर्घटनेनंतर हेलिकॉप्टरचा आणखी एक भीषण अपघात समोर आलाय.
गुवाहाटीच्या संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सियांग जिल्ह्यातील तूतिंग मुख्यालयापासून 25 किमी अंतरावर सिसिंग गाव आहे. या गावात लष्कराचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. या ठिकाणी रेस्क्यू टीम दाखल झाली असून बचावकार्य केलं जातं आहे. प्राथमिक माहितीनुसार हेलिकॉप्टरमधील पायलटचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय.
Received very disturbing news about Indian Army’s Advanced Light Helicopter crash in Upper Siang District in Arunachal Pradesh. My deepest prayers ? pic.twitter.com/MNdxtI7ZRq
— Kiren Rijiju (@KirenRijiju) October 21, 2022
दुर्घटनाग्रस्त झालेलं हेलिकॉप्टर एडवान्स लाईट आर्मी हेलिकॉप्टर होतं, असं सांगितलं जातंय. या हेलिकॉप्टरमध्ये दोघेजण होते. हेलिकॉप्टर राज्यातून बाहेर येत असताना ही दुर्घटना घडली. सकाळी साधारण 10.40 वाजण्याच्या सुमारास हा हेलिकॉप्टर अपघात घडला असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. चीनच्या सीमेपासून 35 किलोमीटर अंतरावर हेलिकॉप्टर कोसळलं होतं, असंही कळतंय.
अरुणाचल प्रदेशात अनेकदा हेलिकॉप्टर दुर्घटना घडल्याचं समोर आलंय. 5 ऑक्टोबर रोजी तवांग इथंही उड्डाण करत असलेलं एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं होतं. यात एका पायलटचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेची चौकशी केली जात असून अद्याप त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, 2010 पासून आतापर्यंत अरुणाचल प्रदेशात 6 हेलिकॉप्टर दुर्घटना घडल्यात. त्यात 40 जणांनी आपला जीव गमावलाय.