नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदासाठी जगदीप धनकर (Jagdeep Dhankhar) एनडीएचे उमेदवार असणार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी ही घोषणा केली आहे. मुख्तार अब्बास नक्वी आणि सुरेश प्रभू यांच्या नावाची घोषणा मात्र झाली नाही, त्यामुळे हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. देशाच्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडीने सध्या देशातले राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रपतीपदासाठी भाजपाकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उपराष्ट्रपती पदासाठी भाजपाने (BJP) जगदीश धनकर यांची घोषणा केली आहे. शनिवारी सायंकाळी भाजपाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा झाली. त्यानंतर भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन जगदीप धनकर यांच्या नावाची घोषणा केली.
या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. दुपारी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दुसरीकडे धनकर यांनी शुक्रवारी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार 19 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. 20 जुलै रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना 22 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. देशाचा पुढील उपराष्ट्रपती निवडण्यासाठी 6 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे.
NDA’s candidate for the post of Vice President of India to be Jagdeep Dhankhar: BJP chief JP Nadda pic.twitter.com/RYIeIP7Nug
— ANI (@ANI) July 16, 2022
Governor of West Bengal Jagdeep Dhankhar called on PM Narendra Modi today: PMO pic.twitter.com/BIsY62li5D
— ANI (@ANI) July 16, 2022
उपाध्यक्ष निवडीसाठी 6 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी मतमोजणीही होणार असून निवडणुकीचे निकालही लागणार आहेत. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोन्ही उपराष्ट्रपती पदासाठी एका उमेदवाराच्या नावावर सहमत असल्यास आणि जर एकमत झाले तर मतदानाची गरज भासणार नाही. अशा स्थितीत उपराष्ट्रपतीही सर्वसहमतीने बिनविरोध निवडला जाऊ शकतो. मात्र, याची शक्यता कमीच दिसत आहे. दरम्यान, विद्यमान उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे. व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या चार दिवस आधी देशाचा पुढील उपराष्ट्रपती कोण होणार, हे स्पष्ट होणार आहे.