हैदराबाद | 4 ऑगस्ट 2023 : जयपूर- मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये 31 जुलै रोजी पहाटे आरपीएफ जवान चेतन सिंग याने बेछूट गोळीबार करुन आपले सहकारी आणि तीन प्रवाशांची हत्या केली होती. या प्रकरणात बळी गेलेले एक प्रवासी सईद सैफुद्दीन यांच्या नातेवाईकांना तेलंगणा सरकारने भरीव मदत जाहीर केली आहे. या घटनेत एएसआय टिकाराम मीणा ( आरपीएफ कर्मचारी ), अजगर अब्बास शेख ( रा. मधुबनी- बिहार ), अब्दुल कादरभाई मोहम्मद हुसेन भानपूरवाला ( रा. नालासोपारा, पालघर ) आणि सईद सैफुद्दीन ( तेलंगणा-हैदराबाद ) यांचा मृत्यू झाला होता.
जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये आरोपी आरपीएफ जवान चेतन सिंग याने चौघांना गोळीबारात ठार केल्यानंतर एका प्रवाशाची ओळख पटली नव्हती. या प्रवाशाचे नाव सईद सैफुद्दीन ( 48 ) असे असल्याचे उघडकीस आले असून हा प्रवासी हैदराबाद येथील बाजार घाट परिसरातील रहाणारा असल्याचे उघडकीस आले आहे. सैफुद्दीन हे मोबाईल शॉपमध्ये काम करीत होते. मोबाईल शॉपच्या मालकासोबत ते अजमेरहून मुंबईला परतत असताना ही घटना घडली.
तेलंगणा सरकारचे उद्योग आणि माहीती तंत्रज्ञान मंत्री के.टी रामाराव यांनी शुक्रवारी सईद सैफुद्दीन यांच्या वारसदारांसाठी मदत जाहीर केली. सैफुद्दीन यांच्या विधवा पत्नीला सरकारी खात्यात नोकरी दिली जाणार आहे. यासंदर्भातील आदेश आपण उद्या काढू असे रामा राव यांनी सांगितले. केटीआर यांच्याकडे म्युनिसिपल प्रशासन आणि नागरी विकास खाते आहे. त्यामुळे सरकार सैफुद्दीन यांच्या कुटुंबियांना सरकारी योजनेतून डबल बेडरुमचा फ्लॅटही देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एमआयएमचे खासदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी संसदेत हा विषय उपस्थित केल्यानंतर तेलंगणा सरकारने ही मदत जाहीर केली आहे.