मुंबईः दरवर्षी मोठ्या उत्साहात होणाऱ्या अमरनाथ यात्रेला (Amarnath Yatra) यंदा पुन्हा ब्रेक लागला, ढगफुटीचे संकट (Claud burst) आल्याने अमरनाथ यात्रेमध्ये 16 भाविकांचा मृत्यू झाला आहे. त्यातच आजही अमरनाथ गुहेजवळील हवामान पावसाचे असल्याने जम्मू शहरातून भाविकांची तुकडी आज रवाना होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. कारण आज अमरनाथ गुहेजवळ पुन्हा हवामान खराब असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळेच आजही प्रवासावर तात्पुरती बंदी (Temporary travel ban) घालण्यात आली आहे. पवित्र गुहेजवळ ढगफुटीच्या घटनेत 16 जणांचा मृत्यू झाल्याने यात्रा पुढे ढकलण्यात आली आहे. यावर्षी अमरनाथ यात्रा 43 दिवस चालणार असून 30 जूनपासून दोन मार्गांनी ही यात्रा सुरू करण्यात आली आहे.
यापैकी एक मार्ग 48 किमी लांबीचा आहे, जो दक्षिण काश्मीरच्या पहलगाममधील नूनवानमधून जातो. त्याचवेळी, दुसरा मार्ग तुलनेने लहान आणि 14 किमीचा आहे, जो एक तीव्र चढण आहे आणि मध्य काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील बालटालमधून जातो. तत्पूर्वी, जम्मू शहरातून शनिवारी सुमारे 6,000 यात्रेकरूंची 11 वी तुकडी काश्मीरमधील दोन बेस कॅम्पसाठी रवाना झाली, मात्र, शुक्रवारी सायंकाळी पवित्र गुहेजवळ ढगफुटी झाली. त्यामुळे यात्रा पुढे ढकलण्यात आली.
ढगफुटीनंतर अनेक तंबू आणि सामुदायिक किचन चिखल आणि ढिगाऱ्याच्या कचाट्यात सापडले होते. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) कडक बंदोबस्तात जम्मू शहरातील भगवतीनगर यात्री निवास येथून 279 वाहनांमधील 6,048 यात्रेकरूंची तुकडी रवाना झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सांगितले की, पहाटे 3.30 वाजता, 115 वाहनांमधून 1,404 यात्रेकरू बालटाल मार्गे भगवतीनगर कॅम्पसाठी रवाना झाले, तर 4,014 यात्रेकरू 164 वाहनांमधून पहलगामकडे रवाना झाले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारपर्यंत सुमारे एक लाख भाविकांनी पवित्र गुहेतील शिवलिंगाचे दर्शन घेतले होते, रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे 11 ऑगस्ट रोजी यात्रेची सांगता होणार आहे, मात्र खराव हवामानामुळे आता भाविकांना दर्शन मिळणार की नाही याबद्दल सांशकता आहे.