श्रीनगरः जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) काही दिवसांपूर्वी अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून (Terrorist) एक मोठा खुलासा झाला आहे. भारताचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये परफ्यूम (Perfume bomb) स्वरुपातील बॉम्बनी स्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट होता, अशी कबूली या आरोपींनी दिली आहे. विशेष म्हणजे तपास अधिकाऱ्यांना या दहशतवाद्यांकडे IED परफ्यूमचे व्हिडिओदेखील सापडले आहेत. परफ्यूम वापरण्यासाठी एखाद्या व्यक्तीने बाटलीला उघडण्याचा प्रयत्न केला किंवा तिला दाबलं असता भयंकर स्फोट होतो, अशी माहिती समोर आली आहे. श्रीनगरमध्ये एका पत्रकार परिषदेत पोलीस अधिकाऱ्यांनी नुकतीच याविषयी माहिती दिली.
जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. 20 जानेवारी रोजी दहशतवाद्यांनी दोन IED बॉम्ब प्लांट केले होते. 21 जानेवारी रोजी 20 मिनिटांच्या अंतराने बॉम्बस्फोट झाले. या घटनेशी संबंधित आरिफ नामक दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. तो रियासी येथील रहिवासी आहे. मागील तीन वर्षांपासून सीमेपलिकडील लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा हँडलर म्हणून तो काम पाहत होता.
Visuals of perfume IED which was recovered from the terrorist, Arif.
This is the first time any perfume IED has been recovered by Jammu Police. pic.twitter.com/COynZ9mMsD
— ANI (@ANI) February 2, 2023
फेब्रुवारी 2022 मध्ये शास्त्री नगर येथे एक IED स्फोट झाला. त्या स्फोटांमागेही आरीफच होता. कटारा येथे स्फोटानंतर बसला आग लागली होती. आरीफनेच त्या बसला आग लावली गोती, त्याच्याकडून एक IED जप्त करण्यात आला होता. राजौरी पोलीस ठाणे परिसरात दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला होता.
कटारा येथे बसमध्ये जो IED प्लांट करण्यात आला होता. त्यानंतर आरीफकडून आणखी एक IED जप्त करण्यात आला. तोच परफ्यूम IED असल्याचं पोलिसांनी उघड केलंय.
या परफ्यूम बॉम्बमध्ये IED असून, कुणी त्याला स्पर्श केला किंवा ती बाटली उघडण्याचा प्रयत्न केला अथवा दाबली असता त्यात बॉम्बस्फोट होतो, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
दिलबाग सिंह यांनी सांगितलं की, दहशतवादी आरीफचं पाकिस्तान कनेक्शन आहे. जम्मू काश्मीरमध्ये धार्मिकतेवर तेढ निर्माण करून दहशतवाद पसरवण्यासाठी पाकिस्तानतर्फे प्रोत्साहन दिलं जातं.