नवी दिल्ली | 22 सप्टेंबर 2023 : लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections 2024) आता तोंडावर आल्या आहेत. सर्वच पक्ष त्यासाठी तयारीला लागले आहेत. या मैदानात आपले पारडे जड राहावे यासाठी दोन्ही गट कंबर कसून आहेत. INDIA आघाडीने ध्रुवीकरणाचा प्रयोग सुरु केला आहे. तर भाजप आत्मविश्वासाचे ढोल बडवत असले तरी त्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. शुक्रवारी भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आणखी एक साथीदार जोडला. जनता दल सेक्युलर एनडीएत सहभागी (NDA-JDS Alliance) झाला. जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर दोघांनी सोबत येण्याचा निर्णय जाहीर केला. कर्नाटकातील जुन्या चुका पोटात घेऊन ही चूकभूल देण्या-घेण्याचा कार्यक्रम पार पडला.
भाजपला आत्मविश्वास नडला
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली. या निवडणुकांमध्ये भाजपला धोबीपछाड मिळाली. जेडीएस आणि भाजप कर्नाटकामध्ये एकत्र होते. पण विधानसभा निवडणुकीत भाजप, जेडीएस आणि काँग्रेस स्वतंत्रपणे लढले. विधानसभा निवडणुकीत जेडीएसला मोठा फटका बसला. भाजपचे पण हात होरपळले. हातची सत्ता गेली. त्यानंतर दोन्ही पक्षांनी नवीन समीकरणे तयार करत चुकांवर पांघरुन घातले. या नवीन दोस्तीमुळे कर्नाटकमध्ये भाजपला लोकसभेसाठी मोठी रसद मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
Met Former Chief Minister of Karnataka and JD(S) leader Shri H.D. Kumaraswamy in the presence of our senior leader and Home Minister Shri @AmitShah Ji.
I am happy that JD(S) has decided to be the part of National Democratic Alliance. We wholeheartedly welcome them in the NDA.… pic.twitter.com/eRDUdCwLJc— Jagat Prakash Nadda (@JPNadda) September 22, 2023
जेडीएसकडे एक पण नाही खासदार
जेडीएसचे मुळ दुखणे हे आहे. त्यांच्याकडे सध्या लोकसभेत एकही खासदार नाही. 2019 मध्ये माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांचे नातू प्रज्वल रेवन्ना हे एकमेव निवडून आले होते. हासन लोकसभा मतदारसंघात हा करिष्मा झाला होता. पण कर्नाटक हायकोर्टाने त्यांची खासदारकी रद्द करण्याचा आदेश दिला होता. सध्या जेडीएसकटडे एकही खासदार नाही.
युतीतून काय होईल फायदा
BJP आणि JDS युतीचे अनेक परिणाम दिसतील. या युतीमुळे कर्नाटकातील सामाजिक आणि राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलतील. कर्नाटकच्या लोकसंख्येत जवळपास 17 टक्के लिंगायत समाज आहे. हा समाज भाजपचा मोठा समर्थक असल्याची चर्चा आहे. पूर्वी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा हे पण लिंगायत समाजातून येतात. लिंगायत समाजानंतर राज्यात वोक्कालिगा समाजाचे प्राबल्य आहे. हा समाज 15 टक्के इतका आहे. वोक्कालिगा हा जेडीएस पक्षाचा समर्थक मानण्यात येतो. जेडीएसचे प्रमुख एचडी देवगौडा हे स्वतः वोक्कालिगा समाजाचे आहेत. दोन्ही पक्ष एकत्र आल्याने राज्यात NDA चा मतदानाचा वाटा जवळपास 32 टक्के होईल. सामाजिक आणि राज्यात समीकरणं बदलून एनडीएला मोठा फायदा मिळू शकतो.