भोपाळ | 19 ऑक्टोबर 2023 : मध्य प्रदेशच्या रीवा येथे एक आश्चर्यकारक प्रकार घडला आहे. एका कुटुंबाने बाहेरगावी जाताना चोरीच्या घटनांमुळे घरातले दागिने कचऱ्याच्या डब्यात लपवून ठेवले होते. हे कुटुंब घरी परतण्याच्या आधी घरी जावई पोहचला आणि त्याने घरातला कचरा दारावर येणाऱ्या पालिकेच्या घरघंटी गाडीच्या कचऱ्यात टाकून तो मोकळा झाला. जेव्हा हे कुटुंब घरात पोहचले तेव्हा सासूने कचऱ्याचा डबा पाहीला तर तो रिकामा असल्याने तिला मोठा धक्का बसला. जावयाकडून खरी गोष्ट कळाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला…
मध्य प्रदेशातील रीवा येथील शांती मिश्रा यांचे कुटुंब भोपाळला गेले होते. त्यांनी घरातून निघताना चोरीच्या भीतीने घरातील सर्व दागिने कचऱ्याच्या डब्यात लपविले. परंतू घरी त्यांच्या आधी त्यांचा जावई प्रमोद कुमार पोहचला. जावयाने घरातील कचरा कचऱ्याच्या गाडीच्या कर्मचाऱ्यांना दिला. दुसऱ्या दिवशी शांती मिश्रा घरी परतल्या तर त्यांना कचऱ्याचा डबा रिकामा दिसल्याने त्यांनी सगळ्यांना विचारले. जावयाकडून कचरा टाकल्याचे समजल्यानंतर त्याच्या पाया खालची जमिनीच सरकली. दागिन्यांची किंमत 12 लाख रुपये होती.
या घटनेनंतर चौकशी सुरु केली. हा कचरा विंध्य येथील कचरा डेपोत जमा होतो असे कळाले. या ठिकाणी चार जिल्ह्यांचा कचरा एकत्र होऊन त्यापासून वीज तयार केली आणि आणि खते बनविले जाते. यासंदर्भात कचरा जमा करणाऱ्या कंपनीला मिश्रा यांच्या कुटुंबियांनी खरी बाब सांगितली. कर्मचाऱ्यांनी सहकार्य दाखविले. आणि कचऱ्यातून दागिन्यांची पिशवी शोधून काढली. दागिने सापडल्याचे पाहून शांती मिश्रा यांचा जीव भांड्यात पडला. त्यांनी मॅनेजर देवेंद्र महतो, मुकेश प्रताप सिंह आणि कर्मचाऱ्यांचे कौतूक केले.