बंगळुरु: नागरिकांच्या रोषामुळे कर्नाटक सरकारवर रात्रीच्या संचारबंदीचा (Night Crufew) निर्णय मागे घेण्याची नामुष्की ओढावली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी गुरुवारी संध्याकाळी निवेदन जाहीर करून यासंदर्भात माहिती दिली. (Karnataka government withdraws night curfew order)
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळल्यानंतर कर्नाटक सरकारने गुरुवारपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सरकारच्या या निर्णयाबद्दल नागरिकांनी मोठ्याप्रमाणावर संताप व्यक्त केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी आज मंत्रिमंडळ आणि सरकारी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर येडियुरप्पा यांनी नाईट Night Crufew चा निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले.
नागरिकांच्या मते राज्यात रात्रीच्या संचारबंदीची गरज नाही. त्यामुळे सरकारने रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय मागे घ्यायचे ठरवले आहे, असे येडियुरप्पांनी सांगितले.
कर्नाटक सरकारने नऊ दिवसांसाठी रात्री 11 ते सकाळी 5 या वेळेत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, निर्णयाच्या अंमलबजावणीला सहा तास उरले असताना हा निर्णय रद्द झाला.
काँग्रेस पक्षाने कर्नाटकमधील रात्रीच्या संचारबंदीला विरोध केला होता. हा निर्णय अतार्किक असून तो मागे घेण्यात यावा, अशी मागणी कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी केली होती.
रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेणारे कर्नाटक हे देशातील दुसरे राज्य आहे. सध्या महाराष्ट्रात नाईट कर्फ्यूचा निर्णय लागू करण्यात आला आहे. ही संचारबंदी 5 जानेवारीपर्यंत लागू राहील. महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदीचे नियम लागू राहतील.
कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील 15 दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. त्यामुळे आता महापालिका क्षेत्रांबाहेरही नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिवांच्या परवानगीने संबंधित जिल्ह्यात संचारबंदीची अंमलबजावणी करता येऊ शकते.
संबंधित बातम्या:
थर्टी फर्स्टला लोणावळ्यात जायचा प्लॅन करताय? मग हे वाचाच
Vishwas Nangare Patil | मुंबईच्या नाईट कर्फ्यूवर विश्वास नांगरे पाटील काय म्हणाले?
(Karnataka government withdraws night curfew order)