नवी दिल्लीः देशात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष (Congress President) पदाच्या निवडणुकीची जोरदार चर्चाही सुरू आहे. काँग्रेसध्यक्ष पदावर कोण विराजमान होणार याकडे काँग्रेससह देशाचे लक्ष लागून राहिले आहे. तर दुसरीकेड मात्र राहुल गांधींनी (Rahul Gandhi) या पदासाठी साफ नकार देत घराणेशाहीचा डाग पुसण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, मी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.
2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
त्यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दातच सांगितले होते की, आता येथून पुढचा काँग्रेसचा अध्यक्ष हा गांधी घराण्याबाहेरचाच असेल.
काँग्रेस अध्यक्ष पदासाठी गेल्या 3 वर्षांपासून काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनीही राहुल गांधींचे मन वळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते.
त्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर मात्र हे प्रयत्न अधिक तीव्र झाले आहेत. या प्रयत्नाना जोड म्हणून 10 राज्यांतील काँग्रेसच्या समितीनीही राहुल गांधींना अध्यक्ष व्हावे यासाठी ठरावही मंजूर केले होते. तरीही राहुल गांधींनी अध्यक्षपदासाठी साफ नकरा दिला होता.
माध्यमांनी अध्यक्षपदाच्या प्रश्नावर राहुल गांधींना विचारल्यावर त्यांनी मागील संदर्भ देत म्हणाले की, त्याच मतावर मी अजूनही ठाम आहे. आणि मी अध्यक्ष होणार नसल्याचेही अनेक वेळा स्पष्ट केले आहे असंही ते म्हणाले.
यानंतर होणाऱ्या काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर बसणाऱ्यांना तुम्ही काय सल्ला देणार असं विचारल्यावर, ते म्हणाले की, या पदाला ऐतिहासिक महत्व आहे.
त्या ऐतिहासिक पदावर तुम्ही जात आहात. त्यामुळे ते भारताच्या एका विशिष्ट दृष्टीकोनातून त्याच्याकडे पाहिले जाते.
त्यामुळे या पदावर बसताना तुम्ही अनेक अनेक विचारांचेही एकाच वेळी प्रतिनिधित्व करता. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदाची माळ ज्याच्या गळ्यात पडेल त्यांनी काँग्रेसच्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व केले पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले.
एक व्यक्ती, एका पदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, उदयपूरमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता आणि त्या गोष्टींचे सारेजण अनुसरण करावे असंही त्यांनी सांगितले.
भारत जोडा यात्रेविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, ही एका संकल्पनेवर आधारित यात्रा आहे. यामधून भारताची एक प्रतिमा उंचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
एकजुटीने भारत उभा आहे. हा भारत प्रेमाने भारलेला आहे. तो द्वेषाने भरलेला नाही त्यामुळेच भारताचे अनेक लोक कौतुक करतात असंही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी बोलताना बेरोजगारीवरही सवाल उपस्थित केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली. केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया तारीख 24 ते 30 सप्टेंबरद आहे.
उमेदवारी अर्जांची छाननी 1 ऑक्टोबर असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 8 ऑक्टोबर असणार आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबरला ही निवडणूक होणार असून 19 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहेत.
काँग्रेसमध्ये नव्या अध्यक्ष पदासाठी राजकीय मोर्चेबांधणी सुरू आहे. अटकळ जोरात सुरू आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, काँग्रेसचे दिग्गज नेते शशी थरूर यांच्यानंतर आता खासदार मनीष तिवारी निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहेत.