गोष्ट आहे एप्रिल 1929 मधील सेंट्रल असेंब्लीमध्ये (Central Assembly) अचानक बॉम्बचा धमाका झाला. त्यानंतर दोन तरुण आपल्या जागेवरून उठले आणि त्यांच्या जवळील काही पत्रिका फेकून इन्कलाब झिंदाबादचा घोष करू लागले. त्या तरुणांना पळून जाण्याची संधी होती. मात्र तसे न करता त्यांनी इन्कलाब झिंदाबादचा घोष सुरूच ठेवला आणि इंग्रजांच्या स्वाधीन झाले. आपला आवाज देशातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अटक होण्याची त्यांना आवश्यकता वाटली. सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकणाऱ्या त्या दोन तरुणांचे नाव होते भगत सिंह (Bhagat Singh) आणि बटुकेश्वर दत्त (Batukeshwar Dutt). अटक झाल्यानंतर बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंह यांनी म्हटले होते की, बहिऱ्या लोकांपर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी बॉम्बच्या धमाक्याची आवश्यकता होती. स्वातंत्र्य चळवळीतील एक मोठी घटना म्हणून या घटनेचा उल्लेख होतो. ज्यांची स्वतंत्र भारतात एका वीरांसारखी पूजा व्हायला हवी होती, त्या बटुकेश्वर दत्त यांचे पुढील आयुष्य मात्र अत्यंत खडतड असे गेले. त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार भगतसिंह यांची जिथे समाधी आहे, तिथेच बटुकेश्वर दत्त यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बटुकेश्वर दत्त यांचा जन्म पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यात 18 नोव्हेंबर 1910 साली झाला. ते आपले नाव नेहमी बी. के. दत्त असेच लिहायचे. त्यांच्या वडिलांचे नाव गोष्ठा बिहारी दत्त आणि आईचे नाव कामिनी देवी असे होते. प्राथिमक शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी बटुकेश्वर दत्त हे कानपूरला आले. तिथे त्यांनी पीपीएन महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. याच काळात त्यांचा संबंध क्रांतिकारकांशी आला. क्रांतिकारकांच्या विचारांनी ते प्रभावित झाले, त्यानंतर त्यांनी देखील क्रांतिकारी चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली. ते हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशनचे सदस्य बनले.
बटुकेश्वर दत्त हे वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी 1924 साली हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशनचे सदस्य बनले होते. त्याचवेळी भगतसिंह हे देखील या संस्थेशी जोडले गेले. याचदरम्यान दोघांचा उद्देश एकच असल्याने त्यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली.चंद्रशेखर आझाद यांच्यामुळे दोघांची मैत्री झाली.दरम्यान काकोरीमध्ये खाजाना लुटल्यानंतर इंग्रजांनी क्रांतिकारकांची धडपकड सुरू केली.
त्यानंतर सेंट्रल असेंब्ली बॉम्बप्रकरणात भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्या दोघांना लाहोरच्या जेलमध्ये पाठवण्यात आले.त्यानंतर भगतसिंह यांना सॅडंर्स या इंग्रज अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले, व त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तर बटुकेश्वर दत्त यांना काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी आंदमानच्या तुरुंगात पाठवण्यात आले.मात्र बटुकेश्वर दत्त हे आंदमानमध्ये आजारी पडल्याने त्यांना बिहारच्या बांकीपूर जेलमध्ये हलवण्यात आले.त्यानंतर त्यांच्या आजारपणाचा विचार करून, स्वातंत्र्यांच्या लढाईत सहभागी होणार नाही या अटीवर त्यांची 1938 मध्ये सुटका करण्यात आली. मात्र परत त्यांनी 1942 साली सुरू झालेल्या भारत छोडो चळवळीत पुन्हा सहभाग घेतला 20 जुलै 1965 रोजी बटुकेश्वर दत्त यांचा मृत्यू झाला. त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार भगतसिंह यांची जिथे समाधी आहे, तिथेच बटुकेश्वर दत्त यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.