भारताला स्वांतत्र्य मिळून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. पुरुषांसोबतच महिलाही खांद्याला खांदा लावून या स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात सहभागी झाल्या. यातील अनेक महिलांना (women) तुरुंगवास देखील भोगावा लागला. आज आपण अशाच एका महिला क्रांतिकारकाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ज्यांचे नाव आहे, प्रीतिलता वड्डेदार (Pritilata Vaddedar) ज्या वयात मुली आपल्या सुखी संसाराचे स्वप्न पहातात त्या वयात प्रीतिलता वड्डेदार या भारतीय स्वांतत्र्य लढ्यात सामील झाल्या होत्या. प्रीतिलता वड्डेदार या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाल्या त्याला एक प्रसंग कारणीभूत ठरला. चितगावच्या युरोपियन क्लबमध्ये (European Club) एक बोर्ड लावण्यात आला होता, त्यावर ‘कुत्रे आणि भारतीयांना’ प्रवेश नाही असे लिहिण्यात आले होते. हा बोर्ड पाहून वड्डेदार यांचा संताप अनावर झाला आणि जोपर्यंत भारतीयांना त्यांचा सन्मान परत मिळून देणार नाही, तोपर्यंत स्वस्त बसणार नाही असे म्हणत प्रीतिलता वड्डेदार या स्वांतत्र्य चळवळीत सहभागी झाल्या.
प्रीतिलता वड्डेदार यांचा जन्म 5 मे 1911 रोजी झाला. प्रीतिलता या बालपणापासूनच हुशार विद्यार्थिनी होत्या. त्यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्या चितगावच्या एका बालिका आश्रममध्ये मुलींना शिकवण्याचे काम करू लागल्या. त्यानंतर त्यांची क्रांतिकारक सूर्यसेन यांच्याशी ओळख झाली. सूर्यसेन यांच्या विचाराने त्या भारावून गेल्या व त्यांनी सूर्यसेन यांच्याकडून शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्या सूर्यसेन यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या युगांतर नावाच्या क्रांतिकारकांच्या समुहात सहभागी झाल्या. त्या क्रांतिकारकांना शस्त्र पुरवण्याचे काम करत असत.
1932 साली युगांतर समुहाचे सदस्य हे सूर्यसेन यांना भेटण्यासाठी पोहोचले. मात्र याचा सुगावा इंग्रज अधिकाऱ्यांना लागला. ज्या घरात क्रांतिकारकांची बैठक सुरू होती, त्या घराला इंग्रजांनी घेराव घातला. यावेळी इंग्रज आणि क्रांतिकारकांमध्ये जोरदार चकमक झाली. यामध्ये काही इंग्रज अधिकारी जखमी झाले. सर्व क्रांतिकारक तेथून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. त्यानंतर इंग्रजांनी प्रीतिलता वड्डेदार यांना मोस्ट वॉटेंड म्हणून घोषित केले.
तेव्हा इंग्रजांच्या प्रत्येक क्लबमध्ये ‘कुत्रे आणि भारतीयांना प्रवेश नाही’ असा बोर्ड लावण्यात यायचा. चितगावच्या युरोपियन क्लबमधील तो बोर्ड पाहून वड्डेदार यांचा संताप अनावर झाला. भारतीयांना त्यांचा सन्मान परत मिळून देईपर्यंत शांत बसणार नाही असा त्यांनी आपल्या मनाशी निर्धार केला. त्यानंतर त्यांनी या क्लबवर हल्ल्याची योजना बनवली. क्रांतिकारकांचा जो गट या क्लबवर हल्ला करणार होता त्याचे नेतृत्व प्रीतिलता या करत होत्या. त्यांनी या क्लबवर हल्ला केला. या हल्ल्यात अनेक इंग्रज अधिकारी जखमी झाले. त्यांना या क्लबमधून बाहेर पडता येणे सहज शक्य होते. मात्र काही क्रांतिकारक आत अडकल्याने त्यांनी प्रथम सर्व क्रांतिकारकांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्यांच्याभोवती इंग्रज पोलिसांचा वेढा पडला होता. आता यातून आपली सुटका होणार नाही असे दिसताच त्यांनी आपल्यासोबत आणलेले पोटॅशियम साईनाईड खाऊन जीवन संपवले.