Rahul Gandhi : वायनाड सोडून राहुल गांधींनी रायबरेलीच का निवडलं ? काँग्रेसची रणनिती काय ?

| Updated on: Jun 18, 2024 | 9:14 AM

राहुल गांधी यांनी वायनाडमधून आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ते रायबरेलीतून खासदार म्हणून काम करणार आहेत. त्यांनी वायनाडची जागा सोडण्यामागे काँग्रेसची नेमकी रणनिती काय ? समजून घेऊया..

Rahul Gandhi : वायनाड सोडून राहुल गांधींनी रायबरेलीच का निवडलं ?  काँग्रेसची रणनिती काय ?
वायनाड सोडून राहुल गांधींनी रायबरेलीच का निवडलं ?
Follow us on

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी हे रायबरेली मतदारसंघातूनच खासदार राहणार आहेत आणि वायनाडची खासदारकी सोडतील. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी याबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे वायनाच्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये प्रियांका गांधी या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार असतील असंही खर्गे यांनी जाहीर केलं.  2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेलीमधून विजय मिळवला होता. मात्र आता त्यांनी वायनाडची खासदारकी सोडण्याचा निर्णय घेतला असून, तेथून प्रियांका गांधी पोटनिवडणुकीसाठी उभ्या राहणार आहेत. नवी दिल्ली येथील पक्षप्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेनंतर पत्रकार परिषदेत हा मोठा निर्णय जाहीर करण्यात आला.

2019 सालच्या निवडणुकीत गांधी परिवाराचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी येथे राहुल गांधी यांचा पारभव झाला. भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल यांना पराभूत करून मोठा विजय संपादन केला. मात्र त्यावेळी केरळमधील वायनाड येथून ते निवडून आले आणि ते लोकसभेत गेले. अशा कठीण काळात साथ देणारे वायनाड सोडून राहुल गांधी यांनी रायबरेलीची निवड का केली ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र राजकीय विश्लेषकांच्या मते खरंतर या निर्णयातून पक्षाची रणनीती दिसते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी उत्साहित होऊन काँग्रेस आक्रमक भूमिका घेत आहे. ‘काँग्रेसचा हा निर्णय एक मजबूत आणि विचारशील राजकीय संदेश आहे’ असे लेखक आणि राजकीय विश्लेषक रशीद किडवाई यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नमूद केले.

त्यांच्या सांगण्यानुसार, 2029 च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसला वेळेचा सदुपयोग करायचा आहे. 2014 आणि 2019 च्या तुलनेत नरेंद्र मोदी हे राजकीयदृष्ट्या कमकुवत परिस्थितीत आहेत. कारण यावेळी केंद्रात भाजपला स्वबळावर बहुमत मिळालेलं नाही तर यंदा एनडीएचं सरकार आहे. त्यामुळे राहुल आणि प्रियंका गांधी दोघांनाही संसदेत पाठवून विरोधकांची बाजू मजबूत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी काँग्रेसच्या प्रचाराचे नेतृत्व केले. मात्र कठीण काळात पाठिशी उभ्या राहणाऱ्या वायनाडऐवजी राहुल गांधी यांची रायबरेली मतदारसंघ का निवडला, याची महत्वाची कारणं जाणून घेऊया.

यूपीमध्ये गमावलेला विश्वास परत मिळवण्याचा करणार प्रयत्न

2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने उत्तर प्रदेशात सहा जागा जिंकल्या. 2019 मध्ये मात्र पक्षाने फक्त रायबरेलीची जागा जिंकली होती. तर या निवडणुकीत इंडिया आघाडीने 43 जागा जिंकल्या, त्यापैकी समाजवादी पक्षाने 37 जागा जिंकल्या. 2019 मध्ये यूपीमध्ये लोकसभेच्या 80 पैकी 62 जागा जिंकणाऱ्या एनडीएसाठी यंदा हा मोठा धक्का होता. 2024 च्या निवडणुकीत एनडीएला केवळ 36 जागा जिंकता आल्या, तर भाजपला 33 जागा मिळाल्या. मतांच्या टक्केवारीच्या बाबतीत, मायावतींच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षाचा (बसपा) सर्वात मोठा पराभव झाला. त्यांची मतांची टक्केवारी 19% वरून 9% पर्यंत घसरली.

ही मते प्रामुख्याने काँग्रेस आणि समाजवादी पक्षाकडे गेली. जर सपाला बसपाच्या 6-7 % मते मिळाली, तर काँग्रेसला 2-3 % फायदा झाला. उत्तर प्रदेशात दलित, मुस्लिम आणि ब्राह्मण मतांचा फायदा उठवता येईल, अशी काँग्रेसला आशा आहे. राहुल गांधींनी वायनाडऐवजी रायबरेलीची जागा निवडण्याचे हे प्रमुख कारण असल्याचे दिसते.

रणनितीत बदल आणि आक्रमक भूमिका

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने काँग्रेस उत्साहित असून पक्षाने आपली भूमिका बदलली आहे. राहुल गांधींनी रायबरेली येथील जागा राखून ठेवणे आणि वायनाडची जागा सोडणे हे त्या आक्रमक दृष्टिकोनाचे द्योतक आहे. रशीद किदवई यांच्या मते, ‘काँग्रेसने आपली रणनीती बदलली आहे. आता त्यांनी बचावात्मक नव्हे तर आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. वायनाडची जागा हा बचावात्मक दृष्टिकोन होता. कारण 2019 मध्ये अमेठीतून होणारा संभाव्य पराभव पाहता राहुल तेथे पोहोचले होते. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे उत्तर प्रदेशातील निकाल पाहून राहुल यांनी वायनाडऐवजी रायबरेलीची निवड केली आहे.

वायनाडचे खासदार म्हणून राहुल गांधी दक्षिण आणि प्रियांका गांधी या उत्तरेची कमान सांभाळत होत्या, ही काँग्रेसची जुनी रणनीती होती. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीच्या निकालातून धडा घेत काँग्रेसने आपली रणनीती बदलली आहे. ‘महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीमधील चांगल्या कामगिरीमुळे काँग्रेसच्या गटात आशा निर्माण झाली आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांच्या रणनीतीत बदल झाला आहे. तो यशस्वी होईल की नाही, हे येणारा काळच सांगेल, असे किडवई म्हणाले. भाजपला आव्हान द्यायचे असेल, तर दक्षिणेतून नव्हे तर तो पक्ष मजबूत असेल तेथेच लढा द्यावा लागेल.

देशात पुनरुज्जीवनासाठी काँग्रेससाठी उत्तर प्रदेश महत्वाचं

केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असं म्हटले जाते. त्यामुळेच 2014 पासून ज्यावेळी काँग्रेसला उतरती कळा लागली, त्यावेळी त्यांना सर्वात मोठा धक्का उत्तर प्रदेशात बसला. केंद्रीय सत्तेवरील त्यांची पकडही ढिली होऊ लागली. काँग्रेसला केंद्रात स्वबळावर सत्तेवर यायचे असेल, तर त्यांना उत्तर प्रदेशात पुनरुज्जीवन करावे लागेल. समाजवादी पक्षासोबत राहून हा विजय मिळाला असला तरी उत्तर प्रदेशात सहा जागा जिंकणे हे काँग्रेससाठी चांगले लक्षण आहे.

मन जिंकायची असतील तर हार्टलँड जिंकावं लागेल

मन जिंकायची असतील तर आधी काँग्रेसला हार्टलँड जिंकावं लागेल. या ठिकाणी भाजपला एकट्याने आणि प्रादेशिक मित्रपक्षांशी युती करून मुकाबला करावा लागणार आहे. हार्टलँडच्या नऊ प्रमुख राज्यांमध्ये काँग्रेसला आपली कामगिरी सुधारावी लागेल, कारण लोकसभेच्या 543 पैकी 218 खासदार या नऊ राज्यांतून येतात. या निवडणुकीत काँग्रेसने फक्त उत्तर प्रदेश नव्हे तर हरियाणा आणि राजस्थानमध्येही चांगली कामगिरी केली आहे. हिंदी पट्ट्यांत काँग्रेस शक्यतांचा शोध घेत आहे आणि त्यामुळेच राहुल गांधींना उत्तर प्रदेशमधून बढती दिली जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये अधिक जागा जिंकल्यास काँग्रेस बिहारमध्येही प्रभाव पाडू शकतं. तेथे त्यांची राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) सोबत युती आहे.