दिल्लीनंतर कारवाईचा मोर्चा बंगालकडे; बड्या नेत्याच्या घरी सीबीआयची रेड; ‘या’ गोष्टीची होतेय चौकशी

| Updated on: Mar 23, 2024 | 12:26 PM

तृणमूल कॉंग्रेसच्या माजी खासदार महुआ मोइत्रा यांना कॅश फॉर क्वेरी प्रकरणाचा मोठा फटका बसला. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी महुआ मोइत्रा यांच्यावर पैसे मागितल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला. या प्रकरणातील तक्रारींच्या सर्व पैलूंची चौकशी करून सहा महिन्यांत अहवाल सादर करा, असे लोकपालने सीबीआयला सांगितले.

दिल्लीनंतर कारवाईचा मोर्चा बंगालकडे; बड्या नेत्याच्या घरी सीबीआयची रेड; या गोष्टीची होतेय चौकशी
Follow us on

कॅश फॉर क्वेरी प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि माजी खासदार महुआ मोइत्रा यांच्या अडचणी संपण्याचे चिन्ह काही दिसत नाहीये. रिपोर्ट्सनुसार, मोईत्रा यांच्या कोलकाता येथील निवासस्थानावर सीबीआयने छापा टाकला आहे. त्यासोबतच इतर ठिकाणी देखील अधिकारी हे शोध घेत आहेत. गुरूवार 21 मार्च रोजी सीबीआयने, रोजी महुआ मोइत्राविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. लाचलुचपत प्रतिबंधक संस्था लोकपालच्या सूचनेनुसार सीबीआयने एफआयआर नोंदवला.

भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी माजी खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचा (कॅश फॉर क्वेरी) आरोप लावला होता. त्यानंतर सीहीआयने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या प्रकरणातील तक्रारींच्या सर्व पैलूंची चौकशी करून सहा महिन्यांत अहवाल सादर करा, असे लोकपालने सीबीआयला सांगितले. खासदार या नात्याने मोईत्रा यांच्यावर लावण्यात आलेले आरोप ठोस पुराव्यावर आधारित असून ते अतिशय गंभीर आहेत. अशा स्थितीत सत्य शोधण्यासाठी त्याची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे, असे लोकपाल खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले.

महुआ यांच्या वडिलांच्या घरीदेखील छापा

महुआ मोइत्रा यांच्या घरासोबच सीबीआयने तिच्या वडिलांच्या घरीदेखील छापे टाकले आहेत.सीबीआयने माझ्या वडिलांच्या घरी छापा टाकला हे सत्य आहे, मात्र हा छापा कॅश फॉर क्वेरी प्रकरणात नसून अन्य कारणासाठी टाकल्याचे महुआ यांनी स्पष्ट केले.

पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचा महुआवर आरोप

गेल्या वर्षी डिसेंबर 2023 मध्ये महुआ मोइत्रा यांना अनैतिक वर्तनासाठी लोकसभेतून बाहेर काढले होते. पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. यासोबतच त्यांनी त्यांचा संसदीय लॉगिन आयडी पासवर्डही शेअर केला असाही आरोप होता. मात्र महुआ मोइत्रा यांनी हे सर्व हे आरोप स्पष्टपणे फेटाळले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या हकालपट्टीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.

निशिकांत दुबे यांनी लावले आरोप

तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली. एथिक्स कमिटीच्या चौकशीत त्या दोषी आढळल्या होत्या. महुआ यांच्यावर पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचा आरोप लावण्यात आला. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनीच हा आरोप केला होता. उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतरांवर हल्ला करण्यासाठी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून महुआ मोइत्रांनी रोख रक्कम आणि भेटवस्तू घेतला असा आरोप भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लावला होता. या प्रकरणावरून मोठा गदारोळ झाला होता. आणि भाजपने या मुद्द्यावरून टीएमसीवर जोरदार हल्ला चढवला. या आरोपानंतर महुआ यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेऊन दुबे यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला