RG Kar Protest : 41 दिवसांनी कोलकात्यातील डॉक्टरांचा संप मागे, कामावर कधी परतणार ?

| Updated on: Sep 20, 2024 | 8:50 AM

कोलकाता येथील डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणी न्याय देण्याची मागणी करत निवासी डॉक्टरांनी संपाचं हत्यार उपसलं होतं. अखेर 41 दिवसांनी हा संप मागे घेण्यात आला आहे.

RG Kar Protest : 41 दिवसांनी कोलकात्यातील डॉक्टरांचा संप मागे, कामावर कधी परतणार ?
Follow us on

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे आरजीकर रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याची घटना 9 ऑगस्ट रोजी घडली आणि संपूर्ण देश हादरलाच. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आणि देशभरातील निवसी डॉक्टरांनी न्यायाची मागणी करत संपाचं हत्यार उपसलं होतं. 40 दिवसांपेक्षा अधिक काळ हा संप सुरू होता, राज्य सरकारलाही धारेवर धरण्यात आलं होतं. अखेर 41 दिवसांनी हा संप मागे घेण्यात आला असून शनिवार, 21 सप्टेंबर पासून सर्व डॉक्टर कामावर परतणार आहेत. दोन दिवसांपूर्वी या डॉक्टरांच्या शिष्टमंडळाची आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची चर्चा झाली. त्यानंतर ज्युनिअर डॉक्टरांच्या बैठकीत संप मागे घेण्याचा हा निर्णय घेण्यात आला. आज ( शुक्रवार 20 सप्टेंबर) हा संप जाहीररित्या मागे घेतला जाईल आणि शनिवारपासून डॉक्टर्स कामावर रुजू होतील.

भीषण अत्याचाराने देश हादरला

कोलकाता येथील आरजीकर रुग्णालयात महिला डॉक्टरवर अत्याचार करण्यात आला, मात्र आरोपीचा क्रूरपणा एवढ्यावरच थांबला नाही, त्याने त्या डॉक्टरची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध नोंदवत आणि पीडितेला न्याय मिळाला पाहिजे यासाठी या ज्युनियर डॉक्टरांनी संप पुकारला होता. हे प्रकरण सुप्रीम कोर्टातही गेलं.  डॉक्टरांची सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्यानं त्यांनी कामावर परतावं यासाठी सुप्रीम कोर्टाकडून आणि ममता बॅनर्जी यांच्या सरकारकडून अनेक प्रयत्न करण्यात आले.  सरकारतर्फे संपकरी डॉक्टरांशी सतत चर्चा सुरू होती, मात्र न्यायाची मागणी करत डॉक्टर्स त्यांच्या भूमिकेवर ठाम होते.

अखेर बऱ्याच चर्चा, बैठकांनंतर सुरक्षेच्या मुद्द्यावर ठोस उपाययोजनांची खात्री पटल्यानंतर महिन्याभरापासून अधिक काळ सुरू असलेला हा संप मागे घेण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. मात्र तत्पूर्वी आज दुपारी कोलकातामधील स्वास्थ्य भवन ते सीबीआय कार्यालयापर्यंत निषेध आंदोलन करणार आहेत.

 

दरम्यान त्यांचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे ज्युनिअर डॉक्टरांनी सांगितले. राज्यातील अनेक भाग पूरग्रस्त आहेत. पूरग्रस्त भागात आरोग्य सेवा शिबिरे सुरू करून पीडितांना आरोग्य सेवा पुरविल्या जातील. शनिवारपासून आम्ही आंशिक स्वरुपात कामावर रुजू होत आहोत, पण आमचा लढा संपलेला नाही, तो सुरूच राहणार आहे, असे ते म्हणाले. काम सुरु केल्यानंतर प्रशासनावर आमचं लक्ष असणार आहे, काहीही चुकीचं  घडतंय असं वाटलं तर आम्ही पुन्हा ताकदीने मैदानात उतरू असा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे.