देशाची 18 वी लोकसभा अस्तित्वात आली आहे. परंतू हे सरकार फार काळ चालणार नाही असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. एकीकडे बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनाएटेडचे ( JDU ) प्रमुख नितीश कुमार यांनी लालूंचा साथ सोडून भाजपाची संगत केली आहे. ते आता एनडीएच्या आघाडीचा एक भाग बनले आहेत. तर दुसरीकडे इंडिया आघाडीची आणि विशेष करुन आरजेडीची त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा आहे. लालू यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाचे आमदार भाई विरेंद्र यांनी नितीशकुमार लवकरच भाजपाची साथ सोडणार आहेत असा दावा करुन खळबळ उडवून दिली आहे. यानंतर भाजपा बिहारमधून हद्दपार होईल असा दावा त्यांनी केला आहे.
भाई वीरेंद्र यांचा हा दावा एकीकडे असताना दुसरीकडे भाजपा नेते अश्विनी चौबे यांनी भाजपाला बिहारात स्वबळावर लढण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. बिहारचे भाजपा नेते अश्विनी चौबे यांना एनडीएच्या नेतृत्वासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की यावेळी बिहारमध्ये एनडीएला भाजपाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवायला हवी आणि भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार स्थापन केले पाहीजे. अश्विनी चौबे पुढे म्हणाले की संपूर्ण बहुमतात भाजपा एकट्याच्या बळावर पुढे आली पाहीजे, तसेच एनडीएला देखील भाजपाने पुढे आणायला हवे. पक्षात आयात केलेला माल आम्ही सहन करु शकत नाही. आपण निवडणूकीच्या राजकारणापासून दूर राहत आहोत असेही त्यांनी सांगतले.
मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत केंद्रीय नेतृत्व निर्णय घेणार आहे. माझी इच्छा आहे की भाजपाच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये सरकार स्थापन केले पाहीजे. भाजपाने स्वत:च्या बळावर एकटे निवडून यावे आणि एनडीएला देखील पुढे आणावे. त्यासाठी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आतापासूनच कामाला लागावे. मी कोणत्याही पदाच्या लाभाशिवाय हे काम योग्य पद्धतीने करु शकतो असे देखील मंत्री अश्विनी चौबे यांनी म्हटले आहे.