पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेक्स फ्रिडमन यांच्यासोबतच्या पॉडकास्टमध्ये अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड्र ट्रम्प यांच्यापासून ते चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबतच्या संबंधावर महत्त्वाचं भाष्य केलं. पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांच्यासोबत ह्यूस्टनमध्ये केलेल्या बड्या रॅलीचा उल्लेख करून अमेरिकेच्या राष्ट्रपतीसोबत आपले कसे घनिष्ट संबंध आहेत, हे सांगितलं. तर शी जिनपिंग यांच्यासोबत असलेल्या संबंधाबाबतही त्यांनी पहिल्यांदाच जगाला सांगितलं आहे. तसेच मोदींनी यावेळी जागतिक शांततेवरही भर दिला. तसेच विस्तारवादी धोरणाचं राजकारण आता चालणार नाही. आता फक्त शांतता निर्माण करण्यासाठीच काम करावं लागेल, असं मोदींनी स्पष्ट केलं. त्याशिवाय मोदींनी त्यांचं वैयक्तिक आयुष्य, बालपण आणि त्यांचं राजकारण यावर भाष्य केलं.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचे अनुभव मोदींनी मनमोकळेपणाने सांगितले. ह्युस्टनच्या एका स्टेडियममध्ये हाऊडी मोदीचा कार्यक्रम होता. राष्ट्रपती ट्रम्प आणि मी आम्ही दोघेही तिथेच होतो. संपूर्ण स्टेडियम खचाखच भरलेलं होतं. अमेरिकेत एखाद्या कार्यक्रमाला इतकी मोठी गर्दी होणं ही अत्यंत मोठी गोष्ट असते. खेळाचं स्टेडियम भरणं ही सामान्य गोष्ट आहे. पण राजकीय कारणाने स्टेडियम भरून जाणं हे असाधारण गोष्ट होती. मोठ्या प्रमाणावर भारतीय प्रवासी तिथे उपस्थित होते. आम्ही दोघांनी भाषण केलं. ट्रम्प खाली बसून माझं भाषण एकत होते. जेव्हा मी मंचावरून बोलत होतो. तेव्हा अमेरिकेचा राष्ट्रपती प्रेक्षकांमध्ये बसलेले होते, हे त्यांचं मोठेपण होतं, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
आणि मी खाली उतरलो
भाषण झाल्यावर मी खाली उतरलो. अमेरिकेत सुरक्षा अत्यंत कडक असते हे आपण जाणतोच आहोत. तिथला चौकशीचा स्तर वेगळाच असतो. मी खाली उतरून ट्रम्प यांचे आभार मानायला गेलो. सहजपणे त्यांना म्हणालो, तुम्हाला काही अडचण नसेल तर आपण स्टेडियमला एक राऊंड मारूया का? तेव्हा ट्रम्पही तयार झाले, असं मोदींनी सांगितलं.
तेव्हाच मला कळलं की, या माणसात…
जेव्हा मी आणि राष्ट्रपती ट्रम्प स्टेडियमला फेरफटका मारण्याची विनंती केली, तेव्हा मी ट्रम्प यांना लोकांना अभिवादन करायला सांगितलं. हजारो लोकांच्या गर्दीला अशा पद्धतीने अभिवादन करणं हे अमेरिकेच्या लाइफमध्ये अशक्यच होतं. असं असतानाही एका क्षणाचा विचार न करता ट्रम्प यांनी माझं ऐकलं. त्यामुळे अमेरिकेचं संरक्षण तंत्र डिस्टर्ब झालं. पण या माणसामध्ये (ट्रम्प) हिंमत आहे, हे माझ्या एव्हाना लक्षात आलं होतं. ट्रम्प स्वत: डीसिजन घेतात आणि मोदींवर त्यांचा विश्वास आहे, त्यामुळेच मोदी घेऊन चालले तर चला, असा त्यांनी विचार केल्याचं माझ्या लक्षात आलं. आपसातील विश्वास किती मजबूत असतो हे मी त्या दिवशी पाहिलं. मी यावेळी जो ट्रम्प पाहिले, तेच ट्रम्प मी जेव्हा त्यांना निवडणुकीत गोळी लागली तेव्हा पाहिले होते, असं मोदींनी सांगितलं.
म्हणून आमचं जमतं
याशिवाय पीएम मोदींनी व्हाईट हाऊसचा अनुभवही शेअर केला. ट्रम्प यांनी कुणाच्याही मदतीशिवाय त्यांना व्हाईट हाऊसमध्ये फिरवले होते. मी आणि ट्रम्प अमेरिका फर्स्ट आणि इंडिया फर्स्टच्या बाजूचे आहोत. त्यामुळेच आमच्या दोघांचं चांगलं जमतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शी जिनपिंगवर काय म्हणाले?
यावेळी त्यांनी चीनसोबतचे संबंध तसेच चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याबाबतही विधान केलं. भारत आणि चीनच्या दरम्यानचे संबंध यात काही नवीन गोष्ट नाही. दोन्ही देशांची संस्कृती आणि सभ्यता प्राचीन आहेत. अनेक युगांपासून भारत आणि चीन एकमेकांपासून शिकत आला आहे. सोबत येऊन त्यांनी नेहमीच वैश्विक फायद्यासाठी कोणतं ना कोणतं योगदान दिलं आहे. जुन्या अभिलेखातून कळतं की एकेकाळी भारत आणि चीनचा जडीपी जगातील जीडीपीच्या 50 टक्क्याहून अधिक होता. त्यात भारताचं योगदान मोठं होतं. मला असं वाटतं की आमचे संबंध अधिक मजबूत आहेत. जर अनके शतकांचा इतिहास पाहिला तर चीन आणि भारताचा संघर्षाचा इतिहास राहिलेला नाही. एकेकाळी चीनमध्ये बौद्ध धर्माचा मोठा प्रभाव होता. मूळात बौद्ध धर्म भारतातूनच चीनमध्ये गेला, असं सांगतानाच शेजारी देश असल्याने थोडेसे मतभेद होणं स्वाभाविक आहे. पण त्याचं रुपांतर संघर्षात होऊ नये, असं मोदी म्हणाले.