नवी दिल्ली | 3 फेब्रुवारी 2024 : देशातील लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या. वर्ष 1996, भाजप या निवडणुकीत उतरला होता. भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांची तेव्हा भारतात जादू चालली होती. या दोन नेत्यांसोबत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची डरकाळीही फुटत होती. भाजपला या निवडणुकीत| शिवसेना, हरियाणा विकास पार्टी आणि समता पार्टीने साथ दिली होती. मुंबईतले शिवाजीपार्क हे सभा मैदान भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खच्चून भरलं होतं. या सभेला लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. याच सभेत लालकृष्ण अडवाणी यांनी एक जाहीर मोठी घोषणा केली आणि ती अंमलातही आणली.
लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी हे दोघेही भाजपचे वरिष्ठ नेतृत्व. पण, वाजपेयी हे वयाने अडवाणी यांच्यापेक्षा मोठे होते. मात्र, असे असले तरी अडवाणी हे जवळपास दशकभर पक्षाचे अध्यक्ष होते. राममंदिर आंदोलन चालवून त्यांनी पक्षाला नवी दिशा दिली होती. त्यामुळे वयाने मोठे असलेले वाजपेयी हे पक्ष नेतृत्वाच्या शर्यतीत मागे पडत चालले होते.
भाजपमध्ये वाजपेयी यांना निश्चितच सन्मान होता. परंतु, ज्या जया वेळी भावी पंतप्रधान कोण यांच्या नावाची चर्चा पक्षामध्ये होत होती तेव्हा सर्वांच्या मुखी अडवाणी हेच नाव येत होते. त्यानंतर दुसऱ्या नावांची चर्चा होत असे. पण, त्यादिवशी शिवाजी पार्क येथील जाहीर सभेत लालकृष्ण अडवाणी यांनी पक्षाचे भावी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाची घोषणा केली. त्यावेळी एकच कोलाहल झाला.
भाजपच्या पक्ष निर्णयामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची भूमिका किंवा निर्णय हा महत्वाचा मानला जातो. पण, अडवाणी यांनी एवढी महत्त्वाची घोषणा करण्यापूर्वी आरएसएसचीही संमती घेतली नाही. नेमका हाच प्रश्न वाजपेयी यांनी अडवाणी यांना विचारला. त्यावेळी अडवाणींनी त्यांना प्रतीप्रश्न केला. ‘मी तुम्हाला विचारलं असतं तर माझ्या प्रपोजलला हो म्हणाला असता का? तसेच, जर संघाशी सल्लामसलत केली असती तर ते सहमत झाले नसते, असे ठाम उत्तर दिले.
विश्व हिंदू परिषदेने अयोध्या आंदोलनामध्ये भाजपच्या खांद्याला खांदा लावून काम केल होते. पण, त्यांनाही याची काहीच कल्पना नव्हती. अडवाणी यांनी असे अचानक वाजपेयी यांचे नाव घोषित करण्याचे एक प्रमुख कारण होते ते म्हणजे वाजपेयी यांची विरोधी पक्षांमध्ये असलेली चांगली प्रतिमा… अटलजी यांनी आपल्या मधुरवाणीने विरोधी पक्षाच्या नेत्यानाही आपलेसे केले होते. अटलजी यांचे नेतृत्व भाजपच्या मित्रपक्षांनाही अधिक मान्य होते. कदाचित अडवाणी हे भाजपला जास्त मते मिळवूण देण्यास यशस्वी झाले असते. पण, सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना मित्र पक्षांची साथ मिळाली नसती.
लालकृष्ण अडवाणी यांनी नेमकी हीच बाब हेरली होती. त्यामुळे त्यांनी शिवाजीपार्क मेदानावर ही अचानक घोषणा केली होती. अडवाणी यांनी त्यांच्या ‘माय कंट्री माय लाइफ’ या आत्मचरित्रात ” त्यावेळी मी जे केले ते त्याग नव्हते. पक्ष आणि देशाच्या हिताचे काय आणि काय योग्य आहे, याचे तार्किक मूल्यमापन केले गेले होते”, असे लिहिले आहे. पुढे निवडणूक झाली. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे आला आणि अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान झाले.