पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात सार्वजनिक मंचावर खुली चर्चा होणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या दोघांमध्ये खुली चर्चा व्हावी असे मत सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या दोन माजी न्यायमूर्तींसह एका वरिष्ठ पत्रकाराने नोंदवले होते. राहुल गांधींनी त्याचा लागलीच स्वीकार केला आणि पंतप्रधानांना याविषयीचे आवाहन केले होते. भाजपने ताबडतोब या मुद्यावरुन तोफ डागली होती. राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार नसताना ते खुल्या चर्चेची मागणी कशी करु शकतात, असा भाजपचा रोख होता. आता भाजपने भूमिका बदलवली आणि चर्चेचे निमंत्रण स्वीकारले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी एकाच मंचावर येतील, असे तुम्हाला वाटत असेल तर, थोडं थांबा, भाजपची खेळी काय ते तर समजून घ्या…
राहुल गांधींना पत्र
भाजपचे नेते आणि खासदार तेजस्वी सूर्या यांनी राहुल गांधी यांचे खुल्या चर्चेचे निमंत्रण स्वीकारले आहे. त्यांनी याविषयीचे एक लखोटा पण राहुल गांधींना पाठवला आहे. पण याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी खुल्या चर्चेत सहभागी होतील असे नाही. तर त्याऐवजी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अभिनव प्रकाश यांचे नाव भाजपने पुढे केले आहे. म्हणजे खुल्या चर्चेत राहुल गांधी यांच्यासोबत अभिनव प्रकाश मुद्यांवर वाद-विवाद करतील, असा निर्णय भाजपने कळवला आहे.
महत्वाच्या मुद्यांवर चर्चेची इच्छा वाखाणण्याजोगी
अगोदर खुल्या चर्चेस नकार देणाऱ्या भाजपने नंतर हे निमंत्रण स्वीकारले आहे. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत देशातील विविध मुद्यांवर चर्चा करण्यास भाजप तयार आहे. महत्वाच्या मुद्यांवर चर्चेची इच्छा वाखाणण्याजोगी असल्याचे सांगत तेजस्वी यांनी राहुल गांधींचे कौतुक केले. जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून भाजप तयार आहे. भाजपची युवा शाखा, पक्षाची ध्येयधोरणे, देशाच्या भविष्याविषयीची धोरणांवर खुल्या आणि सक्रिय चर्चेत सहभागी होईल, असे त्यांनी कळवले आहे.
#WATCH | On BJP MP & national president of Bharatiya Janata Yuva Morcha (BJYM) Tejasvi Surya nominates him to debate with Congress leader Rahul Gandhi, National VP of BJYM, Abhinav Prakash says, “I would like to thank Tejasvi Surya for deputing me to debate with Rahul Gandhi. I… pic.twitter.com/RoNHGEMGQd
— ANI (@ANI) May 13, 2024
अभिनव प्रकाश यांची खोचक टोला
अभिनव प्रकाश यांनी खुल्या चर्चेसाठी त्यांचे नाव पुढे केल्याने पक्षाचे आभार मानले. “या खुल्या चर्चेची प्रतिक्षा आहे. मी उत्तर प्रदेशातील आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबियांनी दीर्घकाळासाठी या राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. मला खात्री आहे की या खुल्या चर्चेतून राहुल गांधी पळ काढणार नाहीत, जसा त्यांनी अमेठीतून काढला होता, असा खोचक टोला प्रकाश यांनी लगावला.”