नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भारतात राजकीय वातावरण चागलंच तापलंय. काही दिवसांआधी विरोधी पक्षांची पाटण्यात बैठक पार पडली. 2024 ला भाजपविरुध्द आघाडी करण्याचे प्रयत्न बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या कडून सुरु असल्याच यावेळी पाहायला मिळालं. पण, काही विरोधी पक्षांकडून या प्रयत्नांना सुरूंग लावण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं बोललं जात आहे. भाजपच्या विजय रथाला रोखण्यासाठी विरोधी पक्षांची एकत्रित बांधणी करण्याचे प्रयत्न एकीकडे सुरु असताना, काही पक्षांकडून काँग्रेस व्यतिरिक्त तिसरी आघाडी तयार करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती समजत आहे.
नीतीश कुमार यांच्या पुढाकाराने पाटण्यात 15 विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. बैठक संपल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेसाठी तमिळनाडूचे मुख्यंमत्री एम. के. स्टॅलिन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल थांबले नाहीत यावर नीतीश कुमार यांनी सावरासावर केली. यानंतर थोड्याच वेळात आम आदमी पक्षाकडून प्रेस रिलीज जारी करुन काँग्रेस सोबत महागठबंधन न करण्याचा निर्णय घेतला. तर तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आलं नाही. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना निमंत्रण असून देखील ते बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.
काँग्रेसमुळे आम आदमी पक्ष आणि बीआरएस पक्षाने महागठबंधनापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्षाला केंद्र सरकारच्या दिल्लीसंदर्भातील अध्यादेश रद्द करण्यासाठी सर्व विरोधी पक्षाची मदत हवी आहे. याबाबत काँग्रेसने नकार दिला आहे. यामुळे अरविंद केजरीवाल नाराज असल्याचं बोललं जात आहे. तेलंगाणामध्ये बीआरएस आणि काँग्रेस एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. यामुळे केसीआर काँग्रेस पक्षसोडून महागठबंधन बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. 23 जूनला पाटण्यात झालेल्या बैठकीत याच कारणामुळे केसीआर यांना बोलवण्यात आले नसल्याचं माहिती सुत्रांकडून समजली आहे.
2024 च्या लोकसभा निवडणूसाठी विरोधकांचा काँग्रेस सोडून तिसरा मोर्चा बनला, तर त्यात आम आदमी पक्ष, बीआरएस, जेडीएस, लेफ्ट पार्टी आणि स्थानिक विरोधी पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे.विरोधकांची पुढची बैठक काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वात शिमला येथे पार पडणार आहे. या बैठकीत काँग्रेस आणि बाकी क्षेत्रीय पक्षात जागांच्या वाटपावर चर्चा होणार आहे. ज्या राज्यात जो पक्ष ताकदवर आहे, त्याला जास्त जागा मिळाल्या पाहिजेत, असे वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केले आहे. क्षेत्रीय पक्ष काँग्रेसला जास्त जागा देण्यास तयार नाही आहेत, यामुळे तीसरा मोर्चा बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पडद्याआड सुरू असणाऱ्या घडामोडींमुळे राजकीय पटलावर मोठा फेरबदल होऊ शकतो.