लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात सर्व पक्ष तयारी करत आहे. भाजपला सत्तेतून बाहेर करण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. मात्र जागावाटपावरून विरोधकांमध्येही अंतर्गत कलह पाहायला मिळत आहे. भाजपसोबत असलेल्या पक्षांमध्येही नाराजी दिसत आहे. भाजपने 300 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार केलाय. त्यासाठी प्रत्येक जागेसाठी भाजप आपली सर्व ताकद लावत ताकदीचा उमेदवार देत आहे. भाजपने ज्या प्रकारे कंगणा राणावत आणि अरूण गोविल यांना उमेदवारी दिल्याने सर्वांनाच धक्का बसला. अशातच दक्षिण गोव्यामध्ये पल्लवी डेम्पो यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र यावरून विरोधकांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. स्थानिक आणि कोकणी भाषा माहित नसणाऱ्या उमेदवाराला तिकिट दिलं आहे. लोकांचे प्रश्न यांना कसे समजणार असा सवाल करत विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
तिकिट कोणला द्यायचं हा पूर्णपणे भाजपचा अधिकार आहे. मात्र एका उद्योगपतीच्या पत्नीला दिल्याने भाजप त्यांच्या पक्षातील निष्ठावंतांपेक्षा उद्योगपतीला जास्त महत्त्व देत हे दिसून आलं. राजकीय किंवा सामाजिक कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीला तिकिट देत भाजपने हा उमेदवार लादला आहे. याचा काँग्रेसला फायदाच होईल असं गोवा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गिरीश चोडणकर म्हणाले.
दक्षिण गोवा काँग्रेसची जागा काँग्रेसच्या नेत्या फ्रांसिस्को सरदिन्हा यांच्याकडे आहे. भाजप डेम्पो यांना उमेदवारी देत त्यांच्या ब्रॅडचा वापर करून घेत आहे. जिथे त्यांचा पक्ष 1962 नंतर फक्त दोनदा जिंकला आहे. पल्लवी डेम्पो यांना उमेदवारी देत भाजपने मान्य केलं आहे की त्यांच्या पक्षात महिलांसह एकही असा उमेदवार नाही की जो गोमकर मतदारांच्या प्रश्नांचं उत्तर देईल. दक्षिण गोवा जिंकण्यासाठी भाजप डेम्पो ब्रँडवर अवलंबून आहे जे राजकारणामध्ये नवीन आहेत, असं गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी म्हटलं आहे.
भाजपने घोषित केलेल्या उमेदवारावरून विरोधक टीका करू लागले आहेत. मात्र भाजपने उमेदवार देऊन दोन आठवडे झाल्यावरही काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला नाही. पल्लवी डेम्पो यांनी भाजपच्या अनेक महिला मोर्चांमध्ये सहभाग घेतला आहे. विरोधक डेम्पो यांच्या पात्रतेवरून बोलत आहे कारण त्यांना पराभवाची भीती आहे. आमच्या उमेदवारांबाबत बोलण्याआधी विरोधकांना आपल्यातील अंतर्गत कलह मिटवण्यावर लक्ष केंद्रीत करावं, ४ जूनला सर्व काही स्पष्ट होईल, असं म्हणत भाजपचे गोवा प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
दरम्यान, भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारासमोर विरोधी पक्षाकडून कोणता उमेदवार दिला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.