नवी दिल्ली | काँग्रेसचे नेते आणि वायनाड लोकसभा मतदार संघाचे खासदार राहुल गांधी यांना काही दिवसांपूर्वी आपलं संसदेचं सदस्यत्व गमवावं लागलं. ‘सर्वच चोरांचं आडनाव मोदी कसं? या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांच्यावर लोकसभा सचिवालयाने ही कारवाई केली. राहुल गांधी यांच्यावरील या कारवाईनंतर काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली. सोशल मीडियावरही या कारवाईचा निषेध करण्यात आला. काहींनी ही कारवाई योग्य असल्याचं म्हणत समर्थन केलं. तर काहींनी या कारवाईचा तीव्र शब्दात समाचार घेत जाहीर नाराजी व्यक्त केली. राहुल गांधी यांनी यानंतर आपल्या ट्विटर बायोमध्येही बदल केला. अपात्र खासदार असा उल्लेख राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर बायोमध्ये केला आहे.
खासदारकी काढून घेतल्याने राजकारण वातावरण तापलंय. अशातच आता राहुल गांधी यांना आणखी एक नोटीस बजावण्यात आली आहे. पदाला किंमत असते, पद असतं तोवर तुम्हाला प्रतिष्ठा असते, मान असतो, मात्र पद गेल्यानंतर तुम्हाला सर्व गमवावं लागतं, असं म्हटलं जातं. त्यानुसार आता राहुल गांधी यांना आणखी एक गोष्टीवर पाणी सोडावं लगाणार आहे.
राहुल गांधी यांना नोटीस
Lok Sabha Secretariat gives notice to Congress leader Rahul Gandhi to vacate government bungalow.
The allotment of the govt bungalow will be cancelled with effect from 23.04.2023. pic.twitter.com/eymsQlPC0n
— ANI (@ANI) March 27, 2023
राहुल गांधी यांना लोकसभेच्या गृहनिर्माण समितीकडून शासकीय बंगला रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतची माहिती एएनआय या वृत्तसंस्थने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. खासदारांना आणि मंत्र्यांना सरकारकडून शासकीय निवासस्थान देण्यात येतं. मात्र कार्यकाळ संपल्यानंतर निवृत्त सदस्यांना ते निवासस्थान रिकामी करावं लागतं. मात्र राहुल गांधी यांचं खासदार पद रद्द करण्यात आलंय. यामुळे त्यांना बंगला रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कर्नाटकमधील कोलार इथे राहुल गांधी यांनी एप्रिल 2019 मध्ये सभा घेतलेली. गांधींनी या सभेत नीरव मोदी आणि ललित मोदी यांच नाव घेत सर्वच चोरांची नावं मोदी कशी असतात, असा सवाल विचारत हल्लाबोल केला होता. या वक्तव्यावरुन राहुल गांधी यांना खासदारकी गमवावी लागली. लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचं संसदेचं सदस्यत्व रद्द केलं.
दरम्यान राहुल गांधी यांना 2024 मध्येही निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे काँग्रेसला पर्यायाने यूपीएला पंतप्रधानपदासाठी नवा चेहरा शोधावा लागणार आहे. तसेच आता वरच्या न्यायालयाने दिलासा दिल्यानंतरच खासदारकी शाबूत राहू शकते.