Lok Sabha Speaker : शड्डू तर ठोकले पण विरोधकांचे आव्हान किती मोठे? ओम बिर्ला की के. सुरेश, लोकसभेचा अध्यक्ष कोण होणार?

| Updated on: Jun 26, 2024 | 9:19 AM

Om Birla Vs K. Suresh : उपाध्यक्ष पदासाठीचा दावा अमान्य झाल्यामुळे विरोधकांनी आता अध्यक्ष पदासाठी दंड थोपाटल्याची चर्चा रंगली आहे. इंडिया आघाडीने शड्डू ठोकले असले तरी विरोधकांचे आव्हान किती मोठे आहे? अगदी थोड्याचवेळात हे चित्र स्पष्ट होईल.

Lok Sabha Speaker : शड्डू तर ठोकले पण विरोधकांचे आव्हान किती मोठे? ओम बिर्ला की के. सुरेश, लोकसभेचा अध्यक्ष कोण होणार?
संख्याबळ तर एनडीएकडे, किती बळ इंडिया आघाडीकडे
Follow us on

लोकसभा अध्यक्ष पदासाठी बुधवारी, आज निवडणूक होत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने माजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावरच विश्वास टाकला आहे. तर विरोधकांनी के. सुरेश यांना मैदानात उतरवले आहेत. उपाध्यक्ष पदावरचा दावा फेटाळल्यानेच विरोधकांनी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उमेदवार उतरविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. के. सुरेश हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. केरळमधील मवेलीकारा येथून ते 8 वेळा संसदेत पोहचले आहेत. तर ओम बिर्ला हे राजस्थानमधील कोटा येथून तीनदा संसदेत पोहचले आहेत.

इंडिया आघाडीचे बळ तरी किती?

लोकसभा अध्यक्ष पदासाठी आता थोड्याच वेळात 11 वाजता निवडणूक होत आहे. अर्थातच राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी स्पर्धा करताना इंडिया आघाडीचे बळ किती आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. निवडणूक जिंकण्यासाठी 271 हा बहुमताचा आकडा आहे. वायनाड लोकसभा मतदारसंघात पोट निवडणूक होईल. सध्या 542 संख्या असलेल्या लोकसभेत NDA कडे 293 तर इंडिया आघाडीकडे 233 खासदार आहेत. तर 7 खासदारांचा शपथविधी बाकी आहे. त्यात इंडिया आघाडीचे 5 खासदार आहेत. या सात जणांना मतदान करता येणार नाही. तर दोन्ही गटात नसलेल्या YSRCP ने ओम बिर्ला यांच्या पारड्यात मत टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

परंपरेला छेद

लोकसभेच्या उपाध्यक्ष पद विरोधकांना देण्याचा अनेक वर्षांचा पायंडा आहे. पण गेल्या काही वर्षांपासून उपाध्यक्ष पदावरुन विरोधक आणि सरकारमध्ये सहमती दिसत नाही. सरकार विरोधकांना उपाध्यक्ष पद देण्यास अनुकूल नसल्याचे चित्र आहे. लोकसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सरकारने तयारी केली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी त्यासाठी वकिली केली. पण हाती काहीच लागलेले नाही.

निवडणूक होते तरी कशी?

लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड संसदेत उपस्थित खासदारांतून करण्यात येते. लोकसभेत उपस्थित खासदारांपैकी 50 टक्क्यांहून अधिक खासदारांची मते ज्याच्या पारड्यात पडतील, ती व्यक्ती लोकसभा अध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात येते. सध्याच्या लोकसभेत एकूण 542 सदस्य आहेत. वायनाडमध्ये पोटनिवडणूक बाकी आहे. मोदी सरकारकडे 293 असा आकडा आहे. 542 पैकी अर्धे मतदान म्हणजे 271 असा आकडा समोर येतो. सध्याच्या एनडीए सरकारकडे बहुमताचा आकडा असल्याने ओम बिर्ला यांची निवड निश्चित आहे. पण ही निवडणूक बिनविरोध झाली असती तर जगाला एक वेगळा संदेश देण्यात भारतीय लोकशाही यशस्वी ठरली असती, असा अनेक राजकीय धुरणींचे मत आहे.