मुंबई : महाराष्ट्रात कालच लोकसभा निवडणूकीच्या मतदानाचा दुसरा टप्पा पार पडला आहे. महाराष्ट्रात 11 जागांसाठी झालेल्या मतदानात सरासरी 60 टक्के मतदान झाले आहे. महाराष्ट्रातील 11 लोकसभा जागांमध्ये सुप्रिया सुळे, नारायण राणे, शाहु महाराज, उदयनराजे भोसले आदी दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. आता महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, नगर, शिर्डी आणि बीडमध्ये मतदान होत आहे. या तिसऱ्या टप्प्यात विदर्भातील जागा असल्याने विदर्भातील कॉंग्रेसचे दहा आमदार तळ ठोकणार आहेत. तसेच या टप्प्यासाठी कॉंग्रेस आणखी एक हुकूमाचा पत्ता बाहेर काढणार आहे.
आता महाराष्ट्रात लोकसभेच्या उरलेल्या दोन टप्प्यातील 24 जागात राज्यात कॉंग्रेस यंदा लोकसभेच्या केवळ सहा जागा लढवित आहे. त्यामुळे आता कॉंग्रेसने मोठी रणनीती आखली आहे. आता कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रचाराला न आणता कॉंग्रेस त्यांच्या ऐवजी प्रियंका गांधी आणि कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना मैदानात उतरविणार आहे. चौथ्या टप्प्यात कॉंग्रेसची ताकद असलेल्या विर्दभातील कुमक प्रचारासाठी मागविली आहे. कॉंग्रेस आता चौथा टप्प्यात 13 मे रोजी असलेल्या मतदानात पुणे, जालना आणि नंदुरबार येथे उमेदवार उभे केले आहेत. त्यातच राहुल गांधी यांनी याआधीच पुण्यात सभा घेतली आहे. तर प्रियंका गांधी – वढेरा आता नंदुरबार येथे येत्या 10 मे रोजी प्रचारदौरा करणार आहे.
पाचव्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रातील धुळे येथून कॉंग्रेसने आपला लोकसभेचा उमेदवार उभा केला आहे. तर मुंबईतील दोन जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार उभे राहीले आहेत. उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेसचे भूषण पाटील उभे राहीले आहेत. त्यांच्या विरोधात भाजपाने केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना उभे केले आहे. कॉंग्रेसने बहुभाषिक मतदारांची संख्या असलेल्या या जागेवर मराठी उमेदवार देण्याचे धाडस दाखवले आहे. तर मुंबई उत्तर मध्य मतदार संघातून कॉंग्रेसचे माजी दिवंगत खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या वर्षा गायकवाड उभ्या राहील्या आहेत. मुंबईतील या दोन उमेदवारांसाठी आता या परिसरात कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना प्रचारासाठी आणण्याची रणनिती कॉंग्रेसने आखली असून त्यांची 15 मे रोजी रॅली होण्याची शक्यता आहे.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी त्यांचे कॉंग्रेसचा पारंपारिक मतदार संघ असलेल्या उत्तर प्रदेशातील रायबरेलीतून उभे राहीले आहेत. तेथे येत्या 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. तसेच राहुल गांधी देशातील इतर प्रांतातही प्रचार दौरा करीत असल्याने आम्ही मुंबई आणि पुण्यात खरगे आणि प्रियंका गांधी यांना आमंत्रण दिल्याचे कॉंग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. त्यामुळे राहुल गांधी अनुपलब्ध असणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मात्र नाशिक, भिवंडी आणि मुंबईत 15 मे रोजी तीन प्रचारसभा होणार आहेत. तसेच 17 मे रोजी देखील नरेंद्र मोदी यांचा मुंबई रोड शो होणार आहे. गृहमंत्री अमित शाह देखील येत्या 12 मे रोजी मुंबईतील रॅलीला संबोधित करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढत्या मुंबई आणि महाराष्ट्रातील दौऱ्यामुळे नरेंद्र मोदी यांनी आता दक्षिण मुंबईतील पेडर रोड येथे घर घ्यावे आणि गृहमंत्री अमित शाह यांनी बोरीवली आपले घर घ्यावे अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली होती. महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी भाजपाच्या केंद्रीय नेत्यांवर टीका केली होती. त्यांनी कितीही वेळा येऊन मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला तर उद्धव ठाकरे आणि विरोधकांची महाविकास आघाडी आमचे सर्व उमेदवार निवडून आणण्यास समर्थ असल्याचीही संजय राऊत यांनी म्हटले होते. आतापर्यंत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भंडारा, अमरावती, सोलापूर आणि पुणे येथे सभा केल्या आहेत. तर प्रियंका गांधी यांची केवळ लातूर येथे एकच रॅली झाली आहे. तर कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जून खरगे यांची नागपूर येथे रॅली झाली आहे.