उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने एकट्याने भाजपाला चक्क आठ वेळा मतदान केल्याचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्याच्या नयागाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून या प्रकरणात आयपीसीच्या कलम 171-एफ आणि 419, आरपी अॅक्टच्या कलम 128, 132 आणि 136 कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या तरुणाने या प्रकाराचा व्हिडीओ समाजमाध्यमावर दाखल केल्यानंतर खळबळ उडाली त्यानंतर आता या ठिकाणचे मतदान पुन्हा करण्याची विनंती निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे.
सलग आठ वेळा भाजपाला मतदान करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची ओळख पटवून त्याच्या गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील तरुणाचे नाव अनिल सिंह असून तो खिरीया पमारान गावचा रहिवासी आहे. युपीचे मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिणवा यांनी सांगितले की या मतदान केंद्रातील सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर चौकशी करुन प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच उत्तर प्रदेशातील इतर मतदान केंद्रांवर मतदाराची ओळख आणि कागदपत्रं तपासण्याचे काम काळजीपूर्वक करण्याचे आदेश दिले आहेत.
तरुणाचा हाच व्हिडीओ –
अगर चुनाव आयोग को लगे कि ये गलत हुआ है तो वो कुछ कार्रवाई ज़रूर करे, नहीं तो…
भाजपा की बूथ कमेटी, दरअसल लूट कमेटी है। #नहीं_चाहिए_भाजपा pic.twitter.com/8gwJ4wHAdw
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) May 19, 2024
संबंधित तरुणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय क्षेत्रात तसेच प्रशासनात खळबळ उडाली आहे. कथित व्हायरल व्हिडीओत दिसणाऱ्या या तरुणाने भाजपाला मत देताना दिसत आहे. हा व्हिडीओ समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्वीट केला आहे. त्यात अखिलेश यादव यांनी जर निवडणूक आयोगाला यात काही चुकीचे झाले आहे असे वाटत असेल तर त्यांनी काही कारवाई जरुर करावी, अन्यथा..भाजपाची बूथ कमिटी प्रत्यक्षात लूट कमिटी आहे अशी पोस्ट समाजमाध्यमावर केली आहे.